एफडीएचा मोठा दणका! चार ट्रक पनीर-खवा जप्त

तुकाराम मुंढेंच्या अ‍ॅशनने खळबळ

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
पुणे
tukaram mundhe गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच पृष्ठभूमीवर भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात येऊ नयेत, यासाठी एफडीएकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्यात मोठ्या प्रमाणात पनीर आणि खव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 
fda
 
एफडीएच्या पथकाने कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खवा ताब्यात घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्यसाठा आढळल्याने संबंधित ठिकाणी प्रशासनाच्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारवाईसाठी एफडीएचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
गणेशोत्सवाच्या काळात विविध प्रकारच्या मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे अशा पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा केला जातो. मात्र, या काळात भेसळखोरांकडून निकृष्ट दर्जाचे किंवा नियमांचे उल्लंघन करणारे पदार्थ बाजारात आणले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एफडीएची तपासणी मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या पनीर आणि खव्याचे नमुने एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले आहेत. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असून, खाद्यपदार्थांची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच हा मोठ्या प्रमाणातील साठा नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठा कुठे होणार होता आणि संबंधितांकडे आवश्यक परवाने आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
या तपासणीच्या अहवालानंतरच जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ किंवा गुणवत्तेचा प्रश्न आहे का, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या केवळ मोठ्या प्रमाणातील साठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, अंतिम कारवाई तपासाच्या निष्कर्षावर अवलंबून राहणार आहे.
गणेशोत्सवात नागरिक मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतात. त्यामुळे खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. एफडीएच्या या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यावसायिकांमध्येही सतर्कता वाढली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही मिठाई, पनीर, खवा किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, पॅकिंग, उत्पादनाची तारीख आणि विक्रेत्याची विश्वासार्हता तपासण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते.