पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |

 

लंडन

world marathi literary conference जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

लंडनमधील ऐतिहासिक महाराष्ट्र मंडळात आयोजित कार्यक्रमात त्यांना ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला.

shinde 

महाराष्ट्र भवनात झालेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठमोळ्या परंपरेनुसार शिंदे यांचे स्वागत केले. लंडनमध्ये राहूनही मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या मराठी बांधवांचे शिंदे यांनी कौतुक केले.

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली माती, भाषा आणि संस्कृती विसरत नाही. मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने तिचा गौरव जगभर पोहोचवण्याची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. जागतिक स्तरावर मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरविण्याबरोबरच जगभरातील मराठी भाषकांसाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याचाही विचार सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
 

महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी,’ या सुरेश भट यांच्या ओळींचा उल्लेख करून त्यांनी लंडनमधील महाराष्ट्र मंडळांनी मराठी अस्मिता, भाषा आणि परंपरा जपण्याचे काम पुढेही सुरू ठेवावे, असे आवाहन केले. महाराष्ट्र सरकार आणि आपण स्वतः या कार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 
सरकार विकासाच्या ‘ॲक्सिलेटर’वर

महाराष्ट्राच्या विकासाचा उल्लेख करताना शिंदे यांनी मुंबई-एमएमआरच्या विकासातून मोठी आर्थिक क्षमता निर्माण होऊ शकते, असे सांगितले. महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले असून देशाच्या विकासात राज्याचा सिंहाचा वाटा असावा, ही सरकारची भूमिका आहे. सरकार विकासाच्या ब्रेकवर नाही, तर ॲक्सिलरेटरवर आहे, असे ते म्हणाले.

 
महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’

अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक टनेल आणि ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदरासारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आणि ‘पॉवर हाऊस’ बनत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा दावाही त्यांनी केला.