चाळीस दिवसांपासून पावसाची दांडी

शेतकर्‍यांच्या डोळ्यात चिंतेचे ढग

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
No rain for forty days परिसरात मागील तब्बल ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांसमोर खरीप हंगामाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. शेतीसाठी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च करून उभा केलेला हंगाम आता पावसाअभावी धोक्यात आल्याने वर्षभराचा खर्च कसा भरून निघणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकाला पाण्याची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.
 
 
No rain for forty days
 
या गंभीर परिस्थितीची दखल घेत मंगरूळनाथ येथील उपविभागीय अधिकारी रवि काळे, नायब तहसीलदार रवींद्र राठोड आणि तालुका कृषी अधिकारी आकाश इगोले यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन भेट दिली. पावसाअभावी खराब झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत पिकांची स्थिती, पावसाअभावी झालेले नुकसान आणि निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकर्‍यांनी पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे पिकांवर ओढवलेल्या संकटाची व्यथा अधिकार्‍यांसमोर मांडली. संबंधित पिकांसाठी शक्य त्या उपाययोजना करण्याबाबत अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना धीर दिला. मात्र, आता केवळ पाहणीवर न थांबता प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद घेऊन शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पावसाची प्रतीक्षा आणखी लांबल्यास पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. यावेळी विनोद पाटील जाधव, गंगादीप राऊत, मनोज राऊत, निलेश राऊत, दिगंबर मुखमाले, रवींद्र मुखमाले, गणेश कुटे, अशोक मुखमाले, पांडुरंग खोरणे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.