इस्लामाबाद,
Pakistan steps forward to save Yasin Malik सरला भट्ट हत्याकांडातील आरोपी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) नेता यासीन मलिकला पाकिस्तानने नायक म्हणून गौरवले आहे. मी अपील करणार नाही, या मलिकने घेतलेल्या भूमिकेचे पाकिस्तानने कौतुक केले आहे. पाकिस्तानने भारतीय न्यायव्यवस्थेवरही निराधार आरोप केले आहेत. यासीनने म्हटले आहे की, तो सरला भट्ट हत्याकांडाच्या खटल्याला विरोध करणार नाही़ दोषी आढळल्यास फाशीची शिक्षा भोगण्यास तयार आहे.
मलिकच्या निर्णयाचा संदर्भ देत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, यासीन मलिकची भूमिका केवळ बहाद्दुरी दाखवण्यापुरती मर्यादित नाही. भारतीय न्यायव्यवस्था सरकारच्या हातात एक सोयीस्कर साधन म्हणून काम करत आहे़ सरकार काश्मिरी लोकांचे दमन करत असून, त्यांना न्यायाच्या कोणत्याही मार्गापासून वंचित ठेवले जात आहे़ यासीनच्या निकालाने भारताच्या न्यायव्यवस्थेला धक्का बसला आहे. भारतात काश्मिरी फुटीरतावाद्यांना बदनाम करण्याची मोहीम चालवली जात आहे, असा आराेपही पाकिस्तानने केला आहे.
मलिकच्या प्रकृतीबद्दल पाकिस्तानला चिंता
पाकिस्तानी प्रवक्त्याने यासीन मलिकच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. यासीनने काश्मीरसाठी आपला जीव आणि आरोग्य धोक्यात घातले होते. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा. पाकिस्तान यासीनवरील खटल्याचा निषेध करतो. संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवतावादी संघटनांनी यासीनच्या दुर्दशेकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अपहरण, छळ, अत्याचार अन् हत्या
सरला भट्ट हत्याकांड १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये घडले़ सरला या अनंतनागच्या काझी बाग भागातील काश्मिरी महिला होत्या. त्या श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नवजात शिशू विभागात स्टाफ नर्स म्हणून काम करत होत्या. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांना हाकलून लावण्यासाठी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही त्यांनी नोकरी सोडून पळून जाण्यास नकार दिला हाेता. १५ ते १८ एप्रिल १९९० दरम्यान श्रीनगरमधील सौरा येथील रुग्णालयाजवळील एका वसतिगृहातून जेकेएलएफ दहशतवाद्यांनी सरला भट्ट यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले. त्यांना सुमारे ४-५ दिवस ओलीस ठेवण्यात आले. त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला़ सिगारेटने चटके दिले आणि सामूहिक बलात्काराला सामोरे जावे लागले. त्यानंतर तिला एके-४७ रायफलने गोळ्या घालून ठार करण्यात आले.