ब्रिक्स परिषदेसाठी पुतिन भारतात!

रुपया-रुबल व्यापारावरही चर्चा

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Putin in India for BRICS summit १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात दाखल झाले आहेत. पुतिन यांचे विमान आज पहाटे सुमारे ३ वाजता पालम हवाई तळावर उतरले. त्यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ११ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक होणार आहे. या चर्चेत भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्यासोबतच संरक्षण, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर विशेष भर राहण्याची शक्यता आहे.
 
 
Putin in India for BRICS summit
 
मोदी आणि पुतिन यांच्या चर्चेत संरक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे मुद्दे केंद्रस्थानी असतील. यामध्ये सुखोई-५७ या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचा प्रस्ताव आणि ७५ विमानांच्या संभाव्य करारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या उर्वरित वितरणाचा आढावा तसेच अणु पाणबुड्यांशी संबंधित संरक्षण सहकार्यावरही चर्चा होऊ शकते. दहशतवादविरोधी कारवाई, अंतराळ क्षेत्रातील सहकार्य, अमली पदार्थांची तस्करी आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर यांसारख्या विषयांवरही दोन्ही नेते विचारविनिमय करतील.
 
 
 
ऊर्जा क्षेत्रात कच्च्या तेलाचा पुरवठा हा चर्चेतील आणखी एक महत्त्वाचा विषय ठरणार आहे. भारताने आपल्या गरजेनुसार किती तेल खरेदी करायचे हे ठरवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचा पुरवठा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने रशियासोबत दीर्घकालीन कराराबाबत चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील व्यवहार रुपया आणि रुबल या स्थानिक चलनांमध्ये वाढवून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिल्ली विमानतळावर पुतिन यांचे स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे ही माहिती देताना भारत-रशिया संबंध बहुआयामी आणि दीर्घकालीन असल्याचे नमूद केले.