नवी दिल्ली,
sagar-defence‘सागर डिफेन्स इंजिनिअरिंग लिमिटेड’ या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट-अपला, नौदलासाठी वापरल्या जाणाऱ्या पृष्ठभागावरील आणि पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी सरकारने औद्योगिक परवाना मंजूर केला आहे, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी गुरुवारी दिली.
भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी जहाजांच्या निर्मितीचा परवाना मिळवणाऱ्या मोजक्या खाजगी कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. संबंधित नियामक मंजुरी आणि परवान्याच्या अटींच्या अधीन राहून, ही कंपनी विशिष्ट नौदल संरक्षण प्लॅटफॉर्म्स आणि संबंधित प्रणालींचे डिझाइन, निर्मिती, बांधणी, एकत्रीकरण, असेंब्ली, चाचणी आणि पुरवठा यांसारखी कामे या परवान्यामुळे करू शकेल. याआधी याच वर्षी ‘सागर डिफेन्स इंजिनिअरिंग’ला शस्त्रे, स्फोटके आणि दारूगोळा यांच्या निर्मितीसाठी औद्योगिक परवाना देण्यात आला होता, त्यानंतर ही घडामोड घडली आहे. आधीच्या मंजुरीमध्ये विशिष्ट शस्त्रे, स्फोटके आणि दारूगोळा यांच्या निर्मितीचा समावेश होता, तर अलिकडील परवाना हा पृष्ठभागावरील आणि पाणबुड्यांच्या वेगळ्या श्रेणीशी संबंधित आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष कॅप्टन निकुंज पराशर म्हणाले. यामुळे विशिष्ट धोरणात्मक प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची आमची क्षमता अधिक बळकट होईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ही तंत्रज्ञान-आधारित स्टार्ट-अप कंपनी संरक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रांसाठी स्वायत्त आणि मानवरहित सागरी व हवाई प्रणाली तसेच इतर उत्पादने तयार करते. या परवान्याची मंजुरी ‘सागर डिफेन्स इंजिनिअरिंग’च्या क्षमतेवर दर्शवलेला विश्वास आणि भारताची संरक्षण उत्पादन परिसंस्था बळकट करण्याप्रती असलेली त्यांची कटिबद्धता अधोरेखित करते, असे एकाने सांगितले. ही ‘डीप-टेक’ स्टार्ट-अप कंपनी स्थापनेपासूनच सागरी आणि मानवरहित प्रणालींच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि तिने संरक्षण व सागरी उपयोगांसाठी स्वायत्त व मानवरहित प्लॅटफॉर्म्स विकसित केले आहेत.