पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा

बैल-शेतकऱ्याची हृदयस्पर्शी कहाणी

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Story of an Ox and a Farmer महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात बैलजोडीला केवळ शेतीतील साथीदार म्हणून नव्हे, तर शेतकऱ्याच्या कुटुंबाचा एक भाग म्हणूनही विशेष स्थान आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुक्या जीवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलांची सजावट करून पूजा केली जाते. शेतकरी, माती आणि बैल यांच्यातील याच जिव्हाळ्याच्या नात्याची भावनिक गोष्ट आता मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!’ ही चित्रपटाची टॅगलाइन असून, त्यातून या नात्याची भावनिक बाजू अधोरेखित करण्यात आली आहे.
 
 
 
jodijodi
 
फायनल ड्राफ्ट फिल्म प्रॉडक्शन आणि फेबलफॉक्स मीडिया प्रॉडक्शन यांच्या निर्मितीतील ‘जोडी’चे लेखन ज्ञानेश्वर शांताराम जाधव यांनी केले असून, चित्रपटाचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिरवाईने नटलेल्या शेतातून बैलजोडी नांगर ओढत पुढे जात असल्याचे या पोस्टरमध्ये दिसते. त्याचवेळी पार्श्वभूमीवर दिसणारे ट्रॅक्टर आधुनिक शेतीपद्धतीचे प्रतीक ठरत असून, पारंपरिक शेतीपासून बदलत्या तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवासही पोस्टरमधून सूचित केला आहे.
 
 
‘एक नातं... एक परंपरा... आणि त्यामागची मनाला भिडणारी गोष्ट’ या संकल्पनेभोवती ‘जोडी’ची कथा आकार घेत असल्याचे पोस्टरवरून दिसून येते. आधुनिक काळात शेतीच्या पद्धती बदलत असल्या तरी शेतकरी आणि बैलजोडी यांच्यातील भावनिक बंध कायम असल्याचा आशय चित्रपटातून मांडला जाणार आहे. बैलजोडी आणि तिच्या मालकाच्या नात्याचा वेगळा आणि हृदयस्पर्शी पैलू या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘जोडी’ हा चित्रपट ऑगस्ट 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे पोस्टरवर नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन, शेतीची परंपरा आणि माणूस-बैल यांच्यातील अतूट नात्याची कथा मोठ्या पडद्यावर कशी साकारते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.