कारखेड्यात भरला चिमुकल्यांचा तान्हा पोळा

मातीच्या बैलांच्या पूजेने बालपणातच रुजतोय कृषी संस्कृतीचा अभिमान

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
मानोरा,
tanha pola बैलपोळा या समृद्ध परंपरेची ओळख आणि महत्त्व लहानपणापासूनच मुलांच्या मनात बिंबवावे, यासाठी विदर्भात पूर्वापार चालत आलेली ‘तान्हा पोळा’ ही प्रथा आजही कारखेडा येथे मोठ्या उत्साहात जपली जात आहे. तालुक्यातील कारखेडा गावात आज शेतकर्‍यांच्या उपस्थितीत बालकांनी पारंपारिक पद्धतीने तान्हा पोळा उत्साहात साजरा केला. पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी लहान मुले मातीपासून बनविलेल्या बैलजोड्यांची, नंदी बैलाची पूजा करतात. मोठ्या शेतकर्‍यांनी जसा खर्‍या बैलांचा पोळा भरवला, तसाच लहान मुलांचा हा तान्हा पोळा असतो. यामागे उद्देश एकच शेती, बैल आणि मातीशी असलेली नाळ बालवयातच घट्ट व्हावी.
 
 
tanha pola
 
आज कारखेडा येथे सकाळपासूनच लहान मुलांनी आपापल्या मातीच्या, लाकडाच्या रंगवलेल्या बैलजोड्या अंगणात आणून रांगेत मांडल्या. घरातील महिलांनी रांगोळी काढून, आंब्याच्या पानांचे तोरण बांधून सणाचे वातावरण निर्माण केले. गावातील जेष्ठ महिला, तरुण माता आणि एका जेष्ठ शेतकर्‍याच्या उपस्थितीत या चिमुकल्यांनी आपल्या मातीच्या बैलांची पूजा केली. आरती, हळद-कुंकू, फुले वाहून आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मुलांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. गावातील महिलांनी सांगितले की, मोठा पोळा शेतकर्‍यांचा असतो तर तान्हा पोळा आमच्या लेकरांचा असतो. यातूनच त्यांना बैल म्हणजे काय, शेती म्हणजे काय याची जाणीव होते. मोबाईलच्या युगातही आमची ही परंपरा आम्ही खंडित होऊ देणार नाही.