संत भोजाजी महाराज सेवार्थ दवाखाना ग्रामीण रुग्णांसाठी ठरतोय वरदान

५० हजार रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
आजनसरा,
the sant bhojaji maharaj service श्रीक्षेत्र आजनसरा येथे संत भोजाजी महाराज देवस्थान ट्रस्ट द्वारा संचालित असलेल्या वसुधैव कुटुंबकम सेवार्थ दवाखान्यात गेल्या चार वर्षात ५० हजार रुग्णांवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांकडून उपचार करण्यात आले असून सेवार्थ दवाखाना ग्रामीण रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
 
the sant bhojaji maharaj service
  
आधुनिक चिकित्सा पद्धतीसोबतच आयुर्वेदातील विद्धकर्म, रक्तमोक्षण, अग्निकर्म, लीच थेरपीचा वापर करून आरोग्य सेवा दिली जात असल्याने अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. लवकरच पंचकर्मातील शिरोधारा, जलौकावचरण, शिरावेध, वमन, विरेचन, बस्ती, अभ्यंग, स्नेहन, स्वेदन आदी उपचार सुद्धा सेवार्थ दवाखान्यात उपलब्ध केले जाणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी सांगितले.
 
 
आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्यात वैद्यकीय अधिकार्यांना यश आले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाचा ब दर्जा प्राप्त झालेल्या संत भोजाजी महाराजांच्या आजनसरा या तीर्थस्थळी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून हा दवाखाना सुरू करण्यात आला. गोरगरीब रुग्णांवर उपचार करून सामाजिक दायित्वाच्या संकल्पनेतून रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा मानून काम करण्याचा ध्यास डॉ. विजय पर्बत व दवाखाना व्यवस्थापक डॉ. संदीप लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश जहागीरदार, डॉ. शिवानी भांडेकर यांनी घेतला आहे.
 
उच्च रक्तदाब, मधुमेह रुग्णांची नियमित तपासणी करून मोफत औषधे दिली जात असल्याने पुढे उद्भवणार्या गंभीर आजारापासून सुरक्षा मिळत आहे. तसेच संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्या भाविक-भक्तांना वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्राथमिक उपचार मिळत असून गंभीर रुग्णांना इतरत्र हलविण्यासाठी २४ तास रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे वसुधैव कुटुंबकम सेवार्थ दवाखाना ग्रामीण रुग्णांसाठी व भाविकांसाठी वरदान ठरत आहे. ग्रामीण रुग्णांनी आधुनिक चिकित्सा पद्धतीसोबतच आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विजय पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, सचिव शिवदास पर्बत, कोषाध्यक्ष नामदेव गाढवे, सहसचिव राजेंद्र ढवळे, विश्वस्त रमेश ठाकरे, रामा कोपरकर, विनोद आष्टणकर, श्रावण काचोळे, शालिनी ईखार, महेश कोसूरकर व सेवार्थ दवाखान्याचे व्यवस्थापक डॉ. संदीप लोंढे यांनी केले आहे.