हिंद महासागरात तीन मोठी चक्रीवादळे येणार

इस्रोचा इशारा, ४४ वर्षानंतर प्रथमच मोठ्या आपत्तीची शक्यता

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |

 

बंगळुरू

major cyclones एल निनोच्या प्रभावामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पावसाची तूट वाढत चालली आहे. शेतकरी चिंतेत आहे. अशातच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने उत्तर हिंद महासागरात तीन महिन्यांत तीन चक्रीवादळे येणार असल्याचा इशारा दिला. गेल्या ४४ वर्षांत आलेल्या चक्रीवादळांपेक्षा याचा तडाखा मोठा असू शकतो, अशी शक्यताही संस्थेने वर्तवली आहे.


cyclone
 
इस्रोच्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनोत्तर हंगामात उत्तर हिंद महासागरात तीन चक्रीवादळे तयार होऊ शकतात. पीडीआय (उच्च वेग तीव्रता निर्देशांक) वादळाच्या वाऱ्याचा वेग आणि त्याचा कालावधी यांसारख्या घटकांच्या आधारावर चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली. यासाठी जवळपास ४० वर्षांच्या हवामान आणि सागरी माहितीचे विश्लेषण करण्यात आले. अधिक चक्रीवादळे निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या परिस्थिती आणि त्यांची तीव्रता समजून घेण्यासाठी या माहितीचा वापर करण्यात आला. डिसेंबरपर्यंत ही चक्रीवादळे येणार असून, पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यात मोठी आपत्ती येणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
 

मान्सूनोत्तर हंगामात क्रियाशीलता अधिक

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान उत्तर हिंद महासागरात तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळे तयार होऊ शकतात. इस्रोच्या मते, या वादळांची एकूण शक्ती मागील ४४ वादळांच्या शक्तीपेक्षा सुमारे ८३ टक्के जास्त आहे. याचा अर्थ असा की, या मान्सूनोत्तर हंगामात चक्रीवादळांची क्रियाशीलता अधिक असू शकते.
 

उपग्रहाच्या आधारे हालचालींवर लक्ष

जानेवारी ते ऑगस्टपर्यंतच्या माहितीच्या आधारे, ऑक्टोबर ते डिसेंबर या मान्सूनोत्तर हंगामात चक्रीवादळांच्या हालचालींचा अंदाज लावण्यात आला. उत्तर हिंद महासागराच्या आसपासच्या अनेक प्रदेशात चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. याची तीव्रता गेल्या ४४ वर्षांच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असेल. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान उत्तर हिंद महासागरात येणाऱ्या चक्रीवादळांच्या हालचालींवर उपग्रहाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत असल्याचे इस्राने निवेदनात म्हटले आहे.