अग्रलेख...
to pass the test of being human अल्पवयीन विद्यार्थिनींवर शिक्षकाने अत्याचार केल्याची वाशीम जिल्ह्यातील काटा या लहानशा गावात घडलेली घटना संतापजनक असतानाच पुरुषी मानसिकता किती सडलेली असल्याचेही सांगणारी आहे. ज्या शिक्षकावर चांगले संस्कार रुजवण्याची, मूल्यांची पेरणी करण्याची आणि लहान मुलांना योग्य दिशा दाखवण्याची सर्वोच्च जबाबदारी होती, त्याच पन्नाशीपल्याडच्या शिक्षकाने १४ कोवळ्या विद्यार्थिनींवर अत्याचार केला. ज्ञानदानासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रात काम करणारा हा नराधम दीर्घकाळ उजळ माथ्याने समाजात वावरत होता तेव्हा आपली संपूर्ण सामाजिक व्यवस्था, आपली दक्षता आणि आपली नैतिक सतर्कता किती पोकळ आहे, हेच सिद्ध होत होते. ही घटना केवळ वाशीम किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, सर्वत्र अत्यंत झपाट्याने पसरणाऱ्या आणि मानवी सभ्यतेला आव्हान देणाऱ्या विकृत, शोषक मानसिकतेचे प्रतीक आहे. वासना जेव्हा विवेकाचे सर्व बंध तोडून प्रत्यक्षात येते, तेव्हा मानवाचे रूपांतर कशाप्रकारे राक्षसी प्रवृत्तीत होते, याचेच हे ज्वलंत उदाहरण. अशा प्रसंगी केवळ तात्पुरता राग व्यक्त करून थांबणे पुरेसे नसून, या विकृतीच्या मुळाशी जाऊन तिची सामाजिक, मानसिक आणि वैज्ञानिक कारणे समजून घेणे आणि त्यावर कठोर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

प्राचीन काळापासूनचा मानवी इतिहास, सामाजिक रचना आणि मानवी मेंदूच्या वैज्ञानिक विश्लेषणातून या विकृतीच्या मुळांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. भूतलावरील प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी आणि आपली प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी निसर्गाने काही विशिष्ट क्षमता आणि वरदाने दिली आहेत. या सर्व प्राण्यांपैकी मानवाला निसर्गाने ‘सुपीक मेंदू’ नावाचे एक अत्यंत अद्भुत वरदान दिले. या मेंदूच्या जोरावर मानवाने अथांग उत्क्रांती केली, विज्ञानाचा शोध लावला आणि संस्कृती विकसित केली. दुर्दैवाने याच मेंदूचा दिशाहीन आणि अनियंत्रित वापर करून मानव स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. निसर्गाच्या नियमानुसार, इतर सर्व प्राण्यांमध्ये शारीरिक किंवा लैंगिक संबंध हे केवळ आणि केवळ पुनरुत्पादनापुरते मर्यादित असतात. इतर प्राण्यांमध्ये ही नैसर्गिक, जैविक आणि ठरावीक कालावधीत घडणारी प्रक्रिया असते. मानवाने या जैविक क्रियेला केवळ पुनरुत्पादनापुरते मर्यादित न ठेवता तिला आनंद मिळविण्याच्या आणि शारीरिक समाधानाच्या भावनेशी जोडले.
एखादी सुखद किंवा आनंददायी भावना त्याला वारंवार हवी असते हा मानवी स्वभाव. पण, त्यातूनच तृप्ततेच्या ऐवजी ‘लोभ’ निर्माण होतो, ही त्यातील खरी समस्या. या लोभासोबतच मानवी मनाचा आणखी एक पैलू म्हणजे नवनवीन कल्पनांचा शोध घेणे आणि वैचित्र्याचा ध्यास. वैचित्र्याचा शोध नैतिक चौकटीत राहतो, तेव्हा त्यातून कला, साहित्य आणि विज्ञानाची निर्मिती होते; परंतु जेव्हा हाच शोध कोणत्याही आत्मसंयमाशिवाय किंवा विवेकाशिवाय पुढे जातो, तेव्हा त्यातून विकृती जन्माला येते. उत्तेजनेची भूक कधीही शांत न होणारी असते. क्षणिक सुखानंतर मन आणखी काहीतरी नवीन, वेगळे शोधण्याचा प्रयत्न करते. हीच वृत्ती हळूहळू विकृत रूप धारण करते आणि काटा गावासारख्या घटना घडतात. वासनेच्या या विकृत रूपामागे हजारो वर्षांपासून चालत आलेली बुरसटलेली पुरुषी मानसिकता आणि त्यातून निर्माण झालेली विषमता हेच मुख्य कारण आहे. आपल्या सामाजिक रचनेत पुरुषसत्ताक पद्धतीची मुळे अद्यापही घट्ट आहेत. या मानसिकतेतूनच स्त्रीकडे पाहण्याचा हीन आणि घृणास्पद दृष्टिकोन विकसित झाला आहे.
स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, स्वतःचे विचार, भावना, इच्छा आणि अस्तित्व असलेला ‘जीव’ न मानता, तिला केवळ एक ‘मालकीची वस्तू’ किंवा ‘उपभोगाचे साधन’ म्हणून पाहण्याची धारणा खोलवर रुजली आहे. स्त्री म्हणजे संपत्ती आणि तिचा उपभोग घेणे हा पुरुषाचा अधिकार आहे, असा घृणास्पद अहंपणा या विकृत मनोवृत्तीच्या मागे असतो. लैंगिक अत्याचार केवळ शारीरिक आकर्षणातून किंवा वासनेतून घडत नाहीत. त्यामागे आपली ताकद, अधिकार आणि वर्चस्व सिद्ध करण्याची विकृत मानसिक गरजही असते. लहान मुले, विशेषतः अल्पवयीन मुली, शारीरिक, मानसिकदृष्ट्या असहाय्य आणि दुर्बल असतात. त्या प्रतिकार करू शकत नाहीत, स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत आणि त्यांना कायदेशीर किंवा सामाजिक समज कमी असते. त्यांच्या या हतबलतेचा आणि असाह्यतेचा गैरफायदा घेऊन स्वतःचे हिंस्र वर्चस्व प्रस्थापित करणे, हा अशा नराधमांचा हेतू असतो.
स्त्रीचे वस्तुकरण केले जाते, तेव्हा तिच्या वयाला, तिच्या इच्छेला, तिच्या स्वातंत्र्याला आणि तिच्या संमतीला विकृत पुरुषाच्या नजरेत कोणतेच स्थान राहत नाही. काटा येथील घटनेत अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे की, आरोपी शिक्षकाने त्या लहान मुलींवर अत्याचार करण्यापूर्वी त्यांना मोबाईलवर बळजबरीने अश्लील चित्रफिती दाखवल्या होत्या. तेथे त्याने त्या मुलींची संमती गृहीत धरली होती आणि त्यांनाही गृहीत धरले होते. इंटरनेटवर पाहिलेले विकृत प्रकार प्रत्यक्षात करून पाहण्याची ओढ आजकाल अनेक पुरुषांमध्ये दिसते. अशा वेळी माणसातील ‘विवेक’ पूर्णपणे नष्ट होतो. सारासार विचार करण्याची क्षमता संपुष्टात येते. समोर असणारी व्यक्ती कोण आहे, तिचे वय काय आहे, तिच्याशी आपले नाते काय आहे, याचा कोणताही विचार मनाला शिवत नाही. या स्थितीत अवघ्या काही वर्षांची चिमुरडी मुलगीही त्याला केवळ एक उपभोग्य वस्तू वाटू लागते आणि मग त्यातूनच अत्यंत घाणेरडा, अमानुष खेळ सुरू होतो. स्वतःचे काळे कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून हे गुन्हेगार लहान मुलींवर मानसिक दबाव आणतात, त्यांना धमक्या देतात. काटा येथे तेच घडले.
मानसशास्त्र असे सांगते की, मनातील कोणतीही भावनिक किंवा नैतिक पोकळी ही क्षणिक शारीरिक सुखाने कधीही कायमची भरून निघू शकत नाही. उलट, अशा प्रकारच्या क्षणिक समाधानानंतर अंतर्मनात आणखी मोठी पोकळी निर्माण होते आणि त्यातून पुन्हा एक नवी, अधिक तीव्र इच्छा जन्म घेते. हे एक अत्यंत भयानक मानसिक चक्र आहे, ज्यातून सुटका न झाल्यामुळे ती व्यक्ती वासनेच्या चिखलात रुतत जाते आणि अखेर मानवतेच्या सर्व सीमा ओलांडते. अशा प्रकारच्या अमानुष घटना समाजात घडत राहण्यामागे जेवढी गुन्हेगाराची विकृती कारणीभूत असते, तितकाच समाजाचा दुटप्पीपणा आणि गुन्हे झाकण्याची वृत्तीही कारणीभूत असते. आजही लहान मुलांवर किंवा स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होतात, तेव्हा गुन्हेगाराला लाजीरवाणे वाटण्याऐवजी पीडितांच्या कुटुंबालाच समाजाची भीती वाटू लागते.
बुरसटलेल्या विचारांमुळे अनेकदा कुटुंबांकडून आणि समाजाकडून हे गुन्हे झाकले जातात. समाजाची हीच हतबलता नराधमांचे मनोबल वाढवण्यास खतपाणी घालते. काटा गावातील या घटनेच्या संदर्भात एका महिला शिक्षकाने दाखवलेले धाडस अत्यंत आदर्शवत आहे. या १४ चिमुरड्या मुली घाबरलेल्या स्थितीत असताना या शिक्षिकेने मानसिक आधार दिला आणि ही घटना दडपून न ठेवता नराधमाचा खरा चेहरा पोलिसांसमोर आणला. नोकरीची, सामाजिक दबावाची किंवा परिणामांची पर्वा न करता त्या नराधमाला गजाआड करण्यात या शिक्षिकेने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. अन्यायाविरुद्ध मौन न बाळगता आवाज कसा उठवावा, याचा धडाच या शिक्षिकेने संपूर्ण समाजाला दिला आहे. त्या नराधमासारखे नव्हेत या शिक्षिकेसारखे शिक्षक सर्वत्र हवेत. पुरते शारीरभान न आलेल्या चिमुकलीच्या निरागस डोळ्यांत दहशत निर्माण करणारी अशी विकृती कायद्याचीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या जिवंतपणाची आणि विवेकाची कठीण परीक्षा असते. या परीक्षेत माणूस आणि समाज म्हणून उत्तीर्ण व्हायचे असेल, तर आपल्याला गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करणे बंद करावे लागेल. भीती आणि सहनशीलता बाजूला ठेवून अशा अन्यायाविरुद्ध आणि विकृत मानसिकतेविरुद्ध ठाम, निर्भय आणि एकसंध आवाज उठवावा लागेल. तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित, नैतिक आणि सन्मानजनक समाज देऊ शकू.