व्हेंटिलेटर खरेदी मविआच्या काळातील

यशोमतीताई ‘झूट की गुंज’ थांबवा : कुळकर्णी

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
अमरावती
ventilators purchase राहुल गांधी यांच्या ‘झूट की गुंज’च्या अमरावतीतील शिलेदार यशोमती ठाकूर यांना जिल्हा महिला सामान्य रुग्णालयातील तीन नवजात अर्भकांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करण्याची संधी मिळाली आहे. यशोमती ठाकूर यांची वक्तव्ये म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
 
kulkarni
शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर घेण्यावरून यशोमती ठाकूर यांनी भाजपावर आरोप केले आहेत. ताईंना अलीकडे विस्मरण होऊ लागले आहे. खोटेच बोलायचे असल्याने सत्य काय आहे, हे स्मरणात ठेवावे लागत नाही. प्रत्यक्षात जिल्हा महिला रुग्णालयात असलेले शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि स्वतः यशोमतीताई अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना घेण्यात आले आहेत. रोज उठायचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे हा त्यांचा शिरस्ता आहे. व्हेंटिलेटर्सचा शासन निर्णय ६ जून २०२२ चा आहे. १८ फेब्रुवारी २०२२ ला व्हेंटिलेटर्स खरेदी प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली होती. शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर्स तुमच्या कार्यकाळात लावण्यात आले आणि उलट्या बोंबाही तुम्हीच मारत असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.
खरे पाहता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रकरणी कुठलीही हयगय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. चौकशी अहवाल प्राप्त होताच आरोग्य विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाच जणांना निलंबित केले आहे. त्यात तीन मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही कसूर झाले का याचाही तपास सुरू आहे. चौकशी पूर्ण होताच त्याही संदर्भात दोषींवर कारवाई केली जाईल. पण चौकशीची वाट न पाहता केवळ आदळआपट करायची हा काँग्रेसवाल्यांचा स्वभाव आहे. जिल्हा महिला रुग्णालयातील तीन नवजात अर्भकांच्या मृत्यूमुळे काँग्रेसला दररोज राजकारण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. प्रामुख्याने यशोमती ठाकूर यांनी दररोज रेटून खोटे बोलणे थांबवावे, असेही शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.