मृतदेह स्वीकारला नाही; पोळाही झाला नाही!

१ कोटींची मदत अन् गावाच्या पुनर्वसनाची मागणी

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
सेलू,
wardha news शेतातून घरी परतणार्या रायपूर जंगली येथील शेतकरी भगवान धुर्वे (६५) यांचा वाघाच्या हल्लात ९ रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ठिय्या देत घटनास्थळावरून पार्थिव नेण्यास अधिकार्यांना नकार दिला. गुरूवारी धुर्वे कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने पीडित कुटुंबाला १ कोटींची मदत द्यावी, गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी करत मृतदेह स्वीकारला नाही. या घटनाक्रमामुळे रायपूर येथे सलग दुसर्याही दिवशी तणाव होता. तसेच गावात पोळाही झाला नाही.
 
 
 
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याच्या रायपूर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर जंगल व्याप्त परिसरातील रायपूर जंगली येथील ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक झाला. गुरूवारी भगवान धुर्वे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह रायपूर येथे नेण्यात आला. मात्र एक कोटी रुपयांची मदत जाहीर होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका गावकर्यांनी घेतली. संतप्त ग्रामस्थ व धुर्वे कुटुंबाला बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ते आपल्या पवित्र्यावर कायम राहिल्याने अखेर भगवान यांचा मृतदेह सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्याची वेळ प्रशासनावर आली. संतप्त ग्रामस्थांनी आपल्या मागण्या खासदारांपुढे मांडल्या. त्याला खासदार अमर काळे यांनी समर्थन दिले.