विदर्भात आभाळ दाटणार; नागपूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
पुणे,
Yellow alert for Nagpur सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी मान्सूनच्या परतीचे अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस देशातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विदर्भात ११ सप्टेंबरला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा इशारा आहे. नाशिक घाट, परभणी, हिंगोली आणि नांदेडलाही याच दिवशी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
 
 

Yellow alert for Nagpur 
 
१२ सप्टेंबरला विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वाशिमसह राज्यातील तब्बल ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर १३ सप्टेंबरला यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला आणि वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांसह अनेक भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान, गेल्या आठवड्यात अनेक भागांत पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, १२ आणि १३ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून १४ सप्टेंबरला काहीशी उघडीप मिळू शकते. त्यानंतर १५ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मान्सूनचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वाशिम या भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.