बुमराहसमोर १५ वर्षीय वैभवची कसोटी

नेटमध्ये वेगवान गोलंदाजाचा धडाका

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
bumrah अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाने सरावाला वेग दिला असून, नेट सत्रात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १३ सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. २०२६च्या आशियाई खेळांच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे. मालिकेसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी ११ सप्टेंबरला जोरदार सराव केला. दुखापतीमुळे मागील काही मालिकांना मुकलेला बुमराह आता तंदुरुस्त होऊन संघात परतला असून, त्याच्या गोलंदाजीतील धार सरावादरम्यान स्पष्टपणे दिसून आली.
 
bumrah
 
नेटमध्ये बुमराहच्या वेगवान आणि अचूक चेंडूंचा सामना करताना १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची चांगलीच कसोटी लागली. पीटीआयच्या वृत्तानुसार, वैभवने बुमराहचा पहिला चांगल्या लांबीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला चेंडूचा अंदाज घेता आला नाही. त्यानंतरच्या चेंडूवरही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. बुमराहने तिसऱ्या चेंडूवर अचूक यॉर्कर टाकला, जो वैभवने कसाबसा रोखला. पुढील चेंडू काहीसा कमी लांबीचा असल्याने तो वैभवच्या बॅटची कड घेऊन गेला. मात्र, त्यानंतर पुढे उसळलेल्या बुमराहच्या एका चेंडूवर वैभवने उत्तम फटका लगावत तो कव्हरच्या दिशेने सीमारेषेबाहेर पाठवला. या संपूर्ण सरावादरम्यान बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करताना वैभव चांगलाच घामाघूम झाला.
 
जसप्रीत बुमराहला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जगातील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांमध्ये गणले जाते. वेग, अचूकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता यामुळे कोणत्याही खेळपट्टीवर त्याचा सामना करणे फलंदाजांसाठी मोठे आव्हान मानले जाते. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांमध्ये बुमराहच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष असणार आहे. आगामी काळात भारतीय संघासमोर अनेक महत्त्वाच्या मालिका असून, त्यात बुमराहची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.