पुलाच्या तोंडावरच जीवघेणा खड्डा!

कोट्यवधींच्या रस्ते-पुलाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
आलापल्ली,
bridge पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून अहेरी-चेरपल्ली-पुसुकपल्ली मार्गावरील नुकत्याच नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर सध्या निर्माण झालेली परिस्थिती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. पुलाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणात पाणी साचून खड्डा पडला आहे. खड्ड्यात दगड-माती टाकून वाहनांची ये-जा सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे संबंधित रस्ते व पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांकडून प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.
 
 
bridge
 
पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणे ही बाब नवीन नाही, मात्र नव्याने झालेल्या कोट्यवधींच्या कामावर काही काळातच अशा प्रकारे खड्डे पडणे ही गंभीर बाब आहे. पुलाच्या तोंडावर पडलेला हा खड्डा दुचाकीस्वारांसाठी विशेषतः धोकादायक ठरू शकतो. पाण्यामुळे खड्ड्याची खोली स्पष्ट दिसत नसल्याने वेगाने येणार्‍या वाहनचालकांना त्याचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
 
 
या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच स्थानिक नागरिकांची वाहतूक सुरू असते. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डा दिसून येत नाही. अशा परिस्थितीत एखादे वाहन खड्ड्यात आदळल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फोटोमध्येही पुलाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसत असून, खड्ड्याभोवती दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
 
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून बांधकाम केलेल्या या पुलाला एक वर्षही पूर्णपणे झाला नाही तोच काही महिन्यातच पुलाच्या रस्त्याच्या तोंडावर अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने कोट्यवधींच्या विकासकामाचा दर्जा नेमका किती टिकाऊ आहे? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. उद्घाटनाच्या वेळी विकासकामाचा गाजावाजा होतो, मात्र काही वर्षांतच त्याच कामाची अशी अवस्था होत असेल, तर जबाबदारी कोणाची? असा संतप्त प्रश्‍न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या पुलाच्या कामाची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पाहणी करण्यात यावी. रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात आलेले साहित्य, पाण्याचा निचरा, रस्त्याची मजबुती आणि पुलाला जोडणार्‍या मार्गाची गुणवत्ता यांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी (टेक्निकल ऑडिट) करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी जोर धरत आहे.