गोंदिया,
goregaons kurhad गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुर्हाडी गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने गावातील शांतता व सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. कारवाईनंतरही सदर अवैध व्यवसायीक पुन्हा त्याच व्यवसायात सक्रिय होत असल्याने अवैध व्यवसाय करणार्यांमध्ये पोलिसांचा धाक हळूहळू कमी होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ७८ गावे येतात. या गावांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून ७ अधिकारी आणि ६४ पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती केली असून सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर २६ होमगार्डचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच पोलिसांकडून परिसरात नियमित गस्त घातली जात असतानाच अनेक दारूबंदी असलेल्या गावांमध्ये अवैध दारूविक्री सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कुर्हाडी गावात तर किराणा दुकानांप्रमाणे अवैध दारूविक्रीची दुकाने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण दूषित होत असून, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अवैध दारू विक्रीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्यांनीही पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. मात्र, त्यानंतरही हा व्यवसाय सुरू असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पोलिस कर्मचार्यांची संख्या उपलब्ध असतानाही अवैध दारूविक्रेत्यांवर प्रभावी नियंत्रण का मिळवता येत नाही, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. कुर्हाडी गावातील काही अवैध व्यावसायिकांवर कारवाई करून तडीपारची कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच आणखी तीन आरोपींविरुद्ध तडीपारचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
- वैशाली ढाले, पोलिस निरीक्षक, गोरेगाव