गुप्तधनासाठी अघोरी पूजेचा डाव

9 जणांना अटक, मुख्य आरोपी फरार

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर
aghori-ritual-to-find-hidden-treasure गुप्तधनाचा शोधण्याकरिता विसापूर शिवारात अघोरी विधीची तयारी करणार्‍या टोळीचा बल्लारपूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याा कारवाईत एका महिलेसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे.
 
aghori
9 सप्टेंबरच्या मध्यरात्री एक संशयास्पद चारचाकी वाहन विसापूर गावाजवळील नदीच्या दिशेने जाताना स्थानिक नागरिकांना दिसले. संशय आल्याने काही नागरिकांनी त्या वाहनावर पाळत ठेवली आणि तातडीने विसापूर पोलिस चौकीत माहिती दिली. त्यानंतर बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने गावाच्या दिशेने परत येत असलेले संबंधीत वाहन कोलगाव-विसापूर मार्गावर अडवले. त्यातील प्रवाशांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, निर्जन नदीकाठच्या शिवारात गुप्तधनासाठी अघोरी पूजा आणि खड्डा खोदण्याची पूर्वतयारी करण्यात आल्याचा उलगडा झाला.पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. तपासात देवागन विक्रम सहारे (42, रा. हिंगणा, नागपूर) याने इतरांना एकत्र आणल्याचे स्पष्ट झाले.
 
राजुरा तालुक्यातील रामपूर येथील शांताराम हिंगणे या फरार आरोपीने आपल्या शेतात गुप्तधन असल्याचे सांगून देवागन याला जागा दाखवण्याचे आमिष दाखवले होते. या कामासाठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील श्यामराव नत्थू आत्राम (59) या मांत्रिकाला पाचारण करण्यात आले होते. गुप्तधनाच्या विधीच्या वेळी एका महिलेची उपस्थिती अनिवार्य असल्याने नागपूरच्या दिपाली दुर्गेश ढवराळ (40) हिला सोबत आणण्यात आले होते. याशिवाय विधीच्या ठिकाणी खड्डा खोदण्यासाठी नरेंद्र बाबुराव राऊत (50, रा. नागपूर) व किशोर नानाजी नैताम (51, रा. यवतमाळ), खड्ड्यातील माती उपसण्यासाठी अमोल रामदास राऊत (32, रा. हिंगणघाट, वर्धा), गुप्तधनाच्या अपेक्षेने आलेला गणेश भदू झाडे (33, रा. कुही, नागपूर), पूजा साहित्य पुरवणारा राहुल सदाशिव खेडेकर (33, रा. आर्वी, ता. राजुरा) आणि नागपूरहून या सर्वांना वाहनाने घेऊन येणारा चालक राम बाबाराव काळे (42, रा. नागपूर) अशा सर्वांची कामाची विभागणी ठरलेली होती. सर्व आरोपी परस्पर समन्वयाने मध्यरात्री अघोरी कृत्य करण्यासाठी एकत्र जमल्याचे सिद्ध झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
या प्रकरणी सर्व आरोपींविरूध्द महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, 2013 मधील कलम 3(2) सह 3(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.