गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन टाळा!

दुष्काळाच्या परिस्थितीवर बावनकुळेंचा भर

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Avoid protests in Mumbai during Ganeshotsav मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेपेक्षा सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक महत्त्वाची असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असून अनेक भागांत पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांची काल बैठक घेण्यात आली असून आज दुपारी ४ वाजता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. ते शनिवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईत आंदोलन झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्यातील सर्व आंदोलकांनी सध्याच्या काळात मुंबईत आंदोलन करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
Avoid protests in Mumbai during Ganeshotsav
 
 
 
ओबीसी असो किंवा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलला जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून इतिहासात यापूर्वी न झालेली काही पावलेही त्यांच्या काळात उचलली गेली आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांवर होणारी टीका महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मराठा समाजाला आतापर्यंत मिळालेला न्याय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या काळात मिळाला असून सरकार या समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सरकारला काही वेळ दिला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा देशातील सर्वात मोठा सण असल्याने या काळात मुंबईसह राज्यात कोणीही आंदोलन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल आणि शेतकरी आत्महत्येपासून कसे वाचतील, हा सरकारसमोरील प्रमुख विषय असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री आणि मुख्य सचिवांना संपूर्ण राज्याचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही निर्देश देण्यात आले असून, अस्तित्वात असलेल्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे. येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांना राज्यातील परिस्थितीचा आढावा दिला जाणार असून, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहे. स्वतःही काही भागांना भेट देणार असून, त्यानंतर संपूर्ण अहवाल आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.