दहशतवादाला माफी नाही...

पहलगाम हल्ल्यावर ब्रिक्सचा एल्गार

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
BRICS condemns Pahalgam attack राजधानीत सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर सदस्य देशांनी एकत्रित भूमिका मांडली आहे. ब्रिक्सच्या संयुक्त घोषणापत्रातून कोणत्याही कारणाने, कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही व्यक्तीकडून करण्यात आलेले दहशतवादी कृत्य गुन्हेगारी आणि असमर्थनीय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला.
 
BRICS condemns Pahalgam attack
 
संयुक्त घोषणापत्रात २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. ब्रिक्स देशांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांची सीमापार हालचाल, दहशतवादासाठी होणारा आर्थिक पुरवठा आणि दहशतवाद्यांना दिली जाणारी सुरक्षित ठिकाणे यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
 
दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व, संस्कृती किंवा वांशिक समूहाशी जोडता कामा नये, असेही ब्रिक्सने स्पष्ट केले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींसह त्यांच्या समर्थकांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जबाबदार धरून शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली. दहशतवादाच्या विरोधात कोणतेही दुहेरी निकष स्वीकारले जाणार नसून शून्य सहिष्णुतेची भूमिका कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
 
दहशतवादाचा सामना करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित राष्ट्रांची असल्याचे ब्रिक्सने नमूद केले. त्याचवेळी दहशतवादाविरोधातील जागतिक प्रयत्न संयुक्त राष्ट्रांच्या सनदेसह आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत असावेत, असेही स्पष्ट करण्यात आले. ब्रिक्स दहशतवादविरोधी कार्यगट आणि त्याच्या पाच उपगटांच्या कामाचे सदस्य देशांनी स्वागत केले असून, दहशतवादविरोधी सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याची मागणीही करण्यात आली आहे.