अमरावती
chikhaldara tourists जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ चिखलदरा येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी यंदा पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. १ जुलैपासून आजपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे ५ लाख ५० हजार पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट दिली आहे. सुमारे ६० हजार चारचाकी, क्रुझर, मिनीबस व ट्रॅव्हल्स तसेच २५ हजार दुचाकी वाहनांची ये-जा झाली. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

पोलिस अधीक्षक निकेतन कदम आणि अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलदरा व परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परतवाडा–चिखलदरा तसेच चिखलदरा–घटांग मार्गे परतवाडा या सुमारे ८२ किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांची कसून तपासणीही सुरू आहे. बंदोबस्तासाठी २५ पोलिस अधिकारी, १२५ पोलिस अंमलदार आणि १२५ होमगार्ड जवान तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास ती तातडीने सुरळीत करण्यासाठी १४ मोटारसायकलींवर २८ पोलिस अंमलदारांचे विशेष पथक सतत गस्त घालत आहे. पर्यटक महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पी.ए. सिस्टीम बसविण्यात आल्या असून, गर्दी व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होऊनही यंदाच्या पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी अथवा कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही.
दरम्यान, अमरावती ग्रामीण पोलिसांकडून ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत पर्यटनस्थळी येणाऱ्या नागरिकांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती, वाहतूक नियमांचे पालन आणि हेल्मेट वापराबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. पोलिसांच्या प्रभावी नियोजनासोबतच अधिकारी व अंमलदारांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे चिखलदऱ्यातील पावसाळी पर्यटन हंगाम सुरक्षित, शिस्तबद्ध आणि वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यात पोलिसांना आतापर्यंत तरी यश आले आहे.