वरूड
gotmar-tradition मध्यप्रदेशातील पांढुर्णा व सावरगाव या दोन गावांमधील प्रेमकथेमुळे ऐतिहासिक परंपरा लाभलेली गोटमार भाविकांच्या श्रद्धेशी जुळली आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून सूर्यास्तापर्यंत चालणाऱ्या या प्रसिद्ध गोटमारीसाठी दोन्ही पक्षांकडून देवी चंडिका मातेची व जाम नदीतील पळसाच्या झाडाची पूजा अर्चना करण्यात आली. सकाळी ११ वाजता जाम नदीच्या किनाऱ्यावर स्थानिक आमदार नीलेश उईके यांनी सर्वप्रथम ५ गोटे मारून गोटमारीला सुरुवात केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी नीरज वशिष्ठ व पोलिस अधीक्षक प्रकाश चंद्र हे पांढुर्ण्यात ठाण मांडून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

मागील तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पांढुर्णा पक्षाकडून तिसऱ्या प्रयत्नात जाम नदीच्या मध्यभागी असलेल्या पळसाच्या झाडावरील झेंडा तोडण्यात आल्याने पांढुर्णा येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. या गोटमारीत एकूण ११८५ नागरिक जखमी झाले. उपस्थित डॉक्टरांच्या हस्ते जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. यामध्ये सावरगाव येथील संजय धारपुरे, नितीन भादे तर पांढुर्णा येथील सचिन थाटेकर, प्रीतम राऊत, राजू कामडे, सचिन नासरे, कैलाश साहू रा. नादनवाडी या गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.
संपूर्ण गोटमारी दरम्यान ७ ठिकाणी उभारण्यात अलेल्या उपचार केंद्रात जखमींवर उपचार करण्यात आले. आवश्यकतेनुसार जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. ७ स्वास्थ्य केंद्र मिळून २५ ॲम्बुलन्स, ३५० वैद्यकीय अधिकारी तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ९१ अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू पांढुरर्ण्यात उपस्थित होती. सुरक्षेच्या दृष्टीने एकूण ७०० पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. संवेदनशील क्षेत्र व मुख्य मार्गावर पोलिसाचा कडेकोट बंदोबस्त होता. यावेळी ३ ड्रोन, १० सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले.