अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा ‘क्लीन स्वीप’ रेकॉर्ड!

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
afghanistan भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार असून, अफगाणिस्तान या मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर नव्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणारा भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मायदेशात पहिली टी-२० मालिका खेळणार आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत तीन टी-२० मालिका खेळल्या असून, त्यापैकी केवळ एका मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी मालिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.
 
afghanistan
 
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मात्र अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम अत्यंत मजबूत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ९ सामने झाले असून, भारताने त्यापैकी ८ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर एक सामना रद्द झाला. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला अद्याप पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. गेल्या काही काळात अफगाणिस्तानने टी-२० क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवत अनेक बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. त्यामुळे भारतासाठी आपला हा अजिंक्य विक्रम कायम ठेवणे सोपे असणार नाही.
 
मायदेशातील आकडेवारीही भारताच्या बाजूने आहे. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने घरच्या मैदानावर आतापर्यंत तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, तिन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांमधील भारतातील अखेरचा सामना २०२४ च्या सुरुवातीला बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता. हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या आणि अखेर भारताने सामना आपल्या नावावर केला. त्यामुळे आगामी मालिकेतही भारतीय संघाचा विजयी सिलसिला कायम राहणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.