नागपूर,
jewellery-fraudलकवाग्रस्त रुग्णाची मालिश करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून गुप्तधनाचे आमिष दाखवत कुटुंबीयांकडून पूजा करून घेतली. यावेळी घरातील सदस्यांवर धुपामुळे गुंगीची अवस्था निर्माण झाल्याची संधी साधून दाम्पत्याने सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूरज रमेश वेदानी (४५) आणि त्याची पत्नी शीला वेदानी (४२) अशी आरोपींची नावे आहेत. हे दाम्पत्य लकवाग्रस्त रुग्णांची मालिश करण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोळ्याच्या दिवशी आरोपी दाम्पत्य फिरत असताना रोहणा येथील हिराबाई काकडे यांच्या घरी गेले. हिराबाई यांच्या आईला मागील दोन महिन्यांपासून लकवा झाला आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्याचे आमिष दाखवत आरोपींनी घरात प्रवेश मिळविला. त्यानंतर औषधांसाठी कुटुंबीयांकडून १४ हजार रुपये खर्च करवून घेतले. दरम्यान, आरोपींनी काकडे यांच्या घरात गुप्तधन गाडले असल्याचे सांगितले. घरात नागाची पूजा केल्यास हे गुप्तधन मिळू शकते, असा दावा त्यांनी केला. त्यासाठी पूजेत घरातील सोन्याचे दागिने ठेवण्यास सांगितले.
कुटुंबीयांनी आरोपींच्या सांगण्यावरून पूजा सुरू केली. यावेळी पूजेसाठी लावलेल्या धुपामुळे घरातील सदस्यांना गुंगी आल्यासारखी अवस्था झाली. याच संधीचा फायदा घेत आरोपी दाम्पत्याने पूजेत ठेवलेले सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आणि तेथून पसार झाले. काही वेळानंतर कुटुंबीयांना दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सूरज वेदानी आणि शीला वेदानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.