जिनपिंग दिल्लीत दाखल, मोदींसोबत भेट

भारत-चीन संबंधांवर नजर

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Jinping arrives in Delhi. ब्रिक्स शिखर परिषद २०२६मध्ये सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. जिनपिंग यांच्या विमानाचे दिल्लीतील पालम विमानतळावर आगमन झाले. भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करणार आहेत. ब्रिक्स परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चाही होणार असून, या भेटीत भारत-चीन संबंधांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
 

Jinping arrives in Delhi. 
 
शी जिनपिंग तब्बल ७ वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आले आहेत. गलवान संघर्षानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१९मध्ये त्यांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर मोदी आणि जिनपिंग यांची परदेशातील विविध ठिकाणी तीन वेळा भेट झाली असली, तरी जिनपिंग यांचे दिल्लीतील आगमन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असून, या चर्चेकडे दोन्ही देशांसह आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
दरम्यान, भारतासोबतचे संबंध अधिक मजबूत करण्याच्या चीनच्या भूमिकेवर चीनचे राजदूत झू फेइहोंग यांनी भर दिला आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी निश्चित केलेल्या चौकटीच्या आधारे पुढे जाण्याची चीनची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि चीनने दोन्ही नेत्यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाची अंमलबजावणी करावी, द्विपक्षीय संबंधांकडे दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहावे, संवाद वाढवावा, सहकार्य मजबूत करावे तसेच मतभेद योग्य पद्धतीने सोडवावेत, अशी चीनची भूमिका आहे. दरम्यान, वेगाने विकसित होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक धोरणांमध्ये समन्वय साधण्यासाठी ब्रिक्स हे महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. जागतिक प्रशासनाबाबत सामायिक भूमिका मांडण्यासोबतच ‘ग्लोबल साउथ’च्या हितांना बहुपक्षीय संस्थांमध्ये पुढे नेण्यासाठीही ब्रिक्सची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.