पाकिस्तानविरुद्ध भारताचा गोलवर्षाव

१९-० असा दणदणीत विजय

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
चीन,
junior hockey asia cup 2026 ज्युनियर हॉकी एशिया कप २०२६ मध्ये भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत तब्बल १९-० असा एकतर्फी विजय मिळवला. या दणदणीत विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले, तर पाकिस्तानला एकही गोल करता आला नाही. भारताकडून तब्बल १३ खेळाडूंनी गोल नोंदवले. यामध्ये पूजा मलिकने सर्वाधिक तीन गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
junior hockey asia cup 2026
 
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. सातव्या मिनिटाला पूजा साहूने भारताचे खाते उघडले आणि त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या गोलपोस्टवर सातत्याने हल्ले चढवले. पहिल्या अर्ध्या सामन्यापर्यंत भारताने तब्बल १० गोल करत सामन्यावर पूर्ण पकड मिळवली होती. त्यानंतर उर्वरित दोन क्वार्टरमध्ये भारताने आणखी ९ गोल केले. पाकिस्तानचा संघ संपूर्ण सामन्यात बचाव करताना दिसला आणि त्यांना एकही गोल नोंदवता आला नाही. पूजा मलिकने तीन गोल केले, तर रोशनी, सानिका, मधु आणि सुप्रियाने प्रत्येकी दोन गोल करत भारताच्या मोठ्या विजयात योगदान दिले.
 
भारतीय संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला असून, सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. भारताने यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये महिला ज्युनियर एशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या स्पर्धेतही भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास अपराजित राहिला आहे. गटसाखळीत भारताने जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या संघांना पराभूत केले होते. आता १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यात विजयी होणाऱ्या संघाशी होणार आहे.