पुणे,
liquor ban in Pune news पुण्यात गणेशोत्सवादरम्यान दारू विक्रीवर १० दिवसांची बंदी घालण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर अखेर प्रशासनाने आपल्या आदेशात बदल केला आहे. सुरुवातीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात १० दिवस दारू विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर ही बंदी आता केवळ दोन दिवसांपुरती मर्यादित करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दारूबंदी लागू करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे दारू विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुणे जिल्ह्यातच १० दिवसांची बंदी का लागू करण्यात आली, असा थेट सवाल प्रशासनाला केला. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागांचा दाखला देत केवळ पुणे जिल्ह्याला अशा प्रकारे लक्ष्य करण्यामागचे कारण काय, अशी विचारणाही न्यायालयाने केली. त्यानंतर प्रशासनाला आपल्या आदेशाचा फेरविचार करावा लागला.
सरन्यायाधीश एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एका जिल्ह्यात अशा प्रकारची मनमानी कारवाई करून पुणे आणि पुणेकरांची बदनामी होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. केवळ पुणेकरच दारू प्यायल्यानंतर गैरवर्तन करतात का आणि संपूर्ण राज्यात फक्त पुणे जिल्ह्यालाच लक्ष्य करण्यामागे नेमका तर्क काय, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. ही बाब पुणेकरांसाठी कलंकासारखी असल्याचेही न्यायालयाने म्हटले. दारू सेवन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईलच, असे गृहीत धरता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. १० दिवस दारू उपलब्ध झाली नाही तर व्यसनाधीन व्यक्तींना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन रुग्णालयांमध्ये गर्दी होईल, अशी उपरोधिक टिप्पणी सरन्यायाधीश त्रिपाठी यांनी सुनावणीदरम्यान केली. न्यायालयाच्या या कठोर भूमिकेनंतर पुणे प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल करत सुरुवातीची १० दिवसांची दारूबंदी कमी करून गणेशोत्सवादरम्यान आता केवळ दोन दिवस दारू विक्रीवर बंदी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.