‘आधी आपल्या पक्षातील खासदार मोजा’

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Maharashtra Politicsअमित शाह ताफ्यातील गाड्या मोजण्यापेक्षा आधी आपल्या पक्षात किती कार्यकर्ते, आमदार आणि खासदार उरले आहेत, ते मोजा,” असा टोला लगावत भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही चांगलेच फटकारले.
 
ban
अमित शाह देशाचे लोहपुरुष आहेत; मात्र उद्धव ठाकरे घरबसल्या राजकारण करणारे नेते आहेत. घरात बसून सरकार चालवणाऱ्यांनी लोहपुरुषांच्या सुरक्षेवर आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करू नये. अशी टीका बन यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
कलम ३७० हटविण्याचा निर्णय, दहशतवादाविरोधातील कारवाई आणि जम्मू-काश्मीरमध्ये बदललेले वातावरण याचा दाखला देत बन म्हणाले की, “अमित शाह यांनी धाडसी निर्णय घेत ३७० कलम हटवले. दगडफेकीच्या मार्गावर गेलेल्या काश्मिरी तरुणांच्या हातांना काम मिळाले. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली. हे अमितभाईंच्या नेतृत्वाचे परिणाम आहेत.
 
काँग्रेसच्या काळातील दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत त्यांनी मोदी सरकारच्या काळातील सुरक्षाव्यवस्थेचेही समर्थन केले. “देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवले आहे. त्यामुळे घरात बसून राजकारण करणाऱ्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वावर टीका करू नये,” असे बन म्हणाले.
 
उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर निशाणा साधताना बन यांनी सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मुद्दा उपस्थित केला. “तुमची श्रद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आहे का, हा प्रश्न महाराष्ट्राला विचारावा लागेल. हिंदुत्वाच्या विचारांवर राजकारण करणाऱ्यांनी सावरकरांचे राष्ट्रवादाचे विचार आणि शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे तत्त्व समजून घेतले पाहिजे,” असे ते म्हणाले.
 
 
उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षण न्यायालयात का टिकवता आले नाही
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही बन यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले. अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्याशी सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकवता आले नाही
मराठा समाजाच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात टिकवता आला नाही. त्यामुळे आज आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आरक्षण टिकविण्यात तत्कालीन सरकार अपयशी का ठरले, याचे उत्तर संजय राऊत यांनी आधी मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला द्यावे, अशी मागणी बन यांनी केली.