मराठा समाजाला फडणवीसच न्याय देतील

अविनाश खळतकर यांचा विश्वास

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नागपूर
maratha-community  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यांनाही मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी राजाश्रय प्राप्त व्हावा याकरिता आंदोलन सुरू आहे. पण महत्त्वाचे म्हणजे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, असा विश्वास भाजपा नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे तज्ज्ञ सदस्य अविनाश नानासाहेब खळतकर यांनी व्यक्त केला आहे.
 
khalatkar
महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी समाजाला आरक्षण मिळावे याकरिता फारसे काहीच केले नाही. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. ते अभ्यासू आणि दूरगामी विचारदृष्टी ठेवणारे लोकनेते आहेत. त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण संविधानाच्या कसोटीवर सर्वोच्च न्यायालयातही टिकावे याकरिता सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही तेच प्रयत्न करून मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, असाच आम्हाला विश्वास असल्याची भूमिका अविनाश खळतकर यांनी मांडली.
 
त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असताना मनोज जरांगे यांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र अंगिकारायला हवा. सरकार आपल्या पद्धतीने कार्य करीत आहे. या स्थितीत सरकारला सहकार्य करण्यापेक्षा अडचणी निर्माण करणे चांगले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जी व्यक्ती आपल्यासाठी रात्रंदिवस लढत आहे, त्यांना सहकार्य करणे आपले आद्यकर्तव्य असल्याची बाब मनोज जरांगे यांनी समजून घ्यायला हवी. जी व्यक्ती मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढते तिला मदत करण्याऐवजी आपण त्यांच्या अडचणी वाढवित राहणार तर मग कुणाकडून अपेक्षा करावी याकडेही अविनाश खळतकर यांनी लक्ष वेधले आहे.
आरक्षण मिळणार याची खात्री
मराठा समाजाला कायद्यानुसार आरक्षण मिळेल याची आम्हाला खात्री आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेले कार्य ते तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. हा त्यांचा स्वभाव पाहता आम्हाला त्यांच्या कर्तबगारीवर शंभर टक्के विश्वास असल्याने आरक्षण मिळणार अशीच खात्री असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे तज्ज्ञ सदस्य अविनाश खळतकर यांनी स्पष्ट केले. आम्हाला विश्वास असल्यानेच आम्ही जन्मापासूनच भाजपासोबत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.