मुलाचे अपहरण करुन दिली जीवे मारण्याची धमकी

तीन तासांत आरोपी जेरबंद

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur Crimeएका आरोपीने १४ वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याच्या वडिलांना फोनवरुन मुलाचा मर्डर करण्याची धमकी दिली. मुलाचे अपहरण होताच वडिलाने पोलिसांत धाव घेतली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तीन तासांत छडा लावून अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक केली. सिद्धार्थ अरुण पिल्लेवान असे आरोपीचे नाव आहे.

gunhe 
 
नंदनवन पोलिस ठाण्यात शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आरोपी सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. सिद्धार्थने त्याच्या पत्नीला जबर मारहाण केली. त्यामुळे अपहृत मुलाच्या वडिलाने सिद्धार्थच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेले आणि आरोपीला भांडण न करण्याबाबत समज दिली. याचा राग आल्याने आरोपीने तक्रारदाराच्या १४ वर्षीय मुलाला त्याच्या घरातून फूस लावून सोबत नेले. त्याचे अपहरण करुन एनआयटी गार्डनमध्ये नेले. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराला फोन करून, पत्नीला तातडीने घरी आणून देण्यास सांगितले. तसे न केल्यास मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली आणि फोन कट केला. या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
 
 
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट-४ पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी तांत्रिक तपासासह गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी नंदनवन येथील एनआयटी गार्डन परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून प्लेझर मोपेडही जप्त करण्यात आली. त्याने रागाच्या भरात मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासासाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय बाबुराव राऊत यांनी केली.