नागपूर,
Nagpur Robberyशेअर बाजारात मोठी रक्कम गेल्यानंतर नैराश्यात गेलेल्या एका युवकाने चक्क बँक लुटण्याचा कट रचला. बँकेतून लुटलेल्या रकमेतून कर्जाची फेड करुन नवीन व्यवसाय उभारण्याच्या विचारात युवक होता. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) शाखेत गुरुवारी सायंकाळी त्या युवकाने बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून रोख रकमेची बॅग लुटून नेली. बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओरड ऐकून घटनेच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लगेच पाठलाग केला आणि आरोपीला पकडले. त्याच्याकडून लुटलेली ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. सूरज भोजराज बोरकर (२८,तातोली, भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज बोरकर हा बी.एस्सीपर्यंत शिकलेला असून एका कंपनीत नोकरीला होता. चांगल्या पगाराची नोकरी असताना त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा नाद लागला. त्यामध्ये तो चांगलाच बुडाला. त्याच्यावर कर्जही झाले. त्याने कर्ज फेडण्यासाठी बँकेतील पैसे लुटण्याचा कट रचला. गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भांडे प्लॉट येथील एसबीआय शाखेतील अधिकारी व कर्मचारी बँकेच्या परिसरातील सीडीएम जवळ पोहोचले. त्यांनी मशीनमध्ये जमा झालेली रोकड काढून बॅगेत ठेवली आणि बँकेच्या आत परत जाऊ लागले.
यावेळी बाजूलाच दबा धरून बसलेला आरोपी सूरज बोरकर बँकेत शिरला. त्याने खिशातून मिरचीपूड काढली आणि रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह आजूबाजूला असलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांरी गोंधळले. धावपळ सुरु असतानाच आरोपीने डाव साधला. त्याने यापूर्वी बँकेची आणि व्यवहारांची रेकी केली असावी, असा संशय आहे. दरम्यान, या गुन्ह्यात तो एकटाच आहे की त्याचे कुणी साथीदार आहेत, याची आता पोलिस चौकशी करीत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.
घटना सीसीटीव्हीत कैद
आरोपी सूरज बोरकर याने केलेला हल्ला आणि घातलेला गोंधळ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांची वेळेवर उडालेली तारांबळही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज शहरभर पसरले असून अनेकांच्या मोबाईलपर्यंत पोहचले आहेत. या घटनेनंतर बँकेची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.