नागपूर,
nagpur-sexual-assault-caseपाणीपुरी विक्रीच्या व्यवसायात भागीदारी असलेल्या युवकाने मित्राच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केला. मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल सहा दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप २८ वर्षीय विवाहितेने लावला आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला. आकाश बघेल (२२) असे आरोपी युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश हा पीडित महिलेच्या पतीसोबत पाणीपुरीचा व्यवसाय करतो. ५ ऑगस्ट रोजी आकाशने महिलेच्या पतीला दारू पाजली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. या घटनेनंतर महिलेने चंद्रपूर येथे पतीविरुद्ध तक्रार केली होती. दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी आकाश हा महिलेला तिच्या मुलांसह गावातील एका परिचिताच्या घरी घेऊन गेला. तेथे महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने महिलेला विविध नातेवाइकांच्या घरी नेले.
११ ऑगस्ट रोजी तो तिला मध्य प्रदेशात घेऊन गेला. तेथील एका हॉटेलमध्येही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत कोणाला माहिती दिल्यास मुलांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याने महिला काही काळ भीतीपोटी गप्प राहिली. अखेर महिलेने पतीसोबत बेलतरोडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.