चंदीगड,
Notorious Amrit Dalam in India पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सला मोठे यश मिळाले असून, परदेशात फरार असलेल्या कुख्यात गँगस्टर अमृतपाल सिंह उर्फ अमृत दलम उर्फ गुरपाल सिंह याला भारतात आणण्यात आले आहे. ‘ऑपरेशन ईस्टर्न रीच’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून फरार झालेला अमृतपाल सिंह मोल्दोव्हामध्ये पकडला गेला होता. युरोपमधील एखाद्या देशातून पंजाब पोलिसांनी केलेले हे पहिले प्रत्यर्पण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पंजाब पोलिसांच्या एजीटीएफ आणि ओएफटीईसी पथकाने केंद्रीय तसेच आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या मदतीने ही संपूर्ण कारवाई पूर्ण केली.

पोलिसांच्या नोंदीनुसार अमृतपाल सिंह हा गँगस्टर जग्गू भगवानपुरियाचा मुख्य हिटमॅन म्हणून काम करत होता. त्याच्याविरोधात पंजाबमध्ये तब्बल २१ गुन्हे दाखल आहेत. यापैकी ४ प्रकरणे न्यायालयात खटल्याच्या टप्प्यात असून, १७ प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे. अमृतपाल सिंह ऑक्टोबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात भारतातून पसार झाला होता. चंदीगडमधून जारी करण्यात आलेल्या बनावट पासपोर्टचा त्याने वापर केला होता. या पासपोर्टवर त्याची ओळख ‘गुरपाल सिंह’ अशी नमूद करण्यात आली होती. भारत सोडल्यानंतर तो प्रथम संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचला आणि त्यानंतर विविध देशांमधून प्रवास करत मोल्दोव्हा येथे दाखल झाला. अमृतपाल सिंहला भारतात आणण्यासाठी पंजाब पोलिसांच्या एजीटीएफ आणि ओएफटीईसी पंजाबने सुमारे सहा महिने गुप्त माहितीच्या आधारे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवली. ‘ऑपरेशन ईस्टर्न रीच’ या नावाने सुरू असलेल्या या मोहिमेत आरोपीवर सातत्याने नजर ठेवण्याबरोबरच भारत आणि परदेशातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात आला.