नवी दिल्ली,
narendra modi भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक सहकार्य आणि समान भागीदारीची भूमिका स्पष्ट केली. “आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही सर्वांसोबत आहोत,” असा स्पष्ट संदेश देत मोदी यांनी ब्रिक्सने प्रत्येक देशाला समान संधी, आवाज आणि सहभाग देणारे व्यासपीठ म्हणून पुढे यावे, असे सांगितले. यावेळी सदस्य देशांमध्ये संयुक्त निवेदनावरही सहमती झाली.
ब्रिक्स शिखर परिषदेच्या उद्घाटनावेळी मोदी यांनी सांगितले की, जगासमोर असलेल्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी ग्लोबल साउथने केवळ विद्यमान नियमांचे पालन करणारी भूमिका न घेता नियम ठरविण्यातही सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. जागतिक संकटांचा सर्वाधिक परिणाम ग्लोबल साउथवर होत असला, तरी जागतिक निर्णय प्रक्रियेत त्याचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे. त्यामुळे विशेषाधिकारांवर आधारित व्यवस्थेऐवजी समान भागीदारीवर आधारित व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोदी यांनी पुढील २० वर्षांसाठी ब्रिक्ससमोर व्यापक आणि दीर्घकालीन अजेंडा निश्चित करण्याची गरज व्यक्त केली. ब्रिक्सचे अध्यक्षपद दरवर्षी बदलत असले तरी संस्थात्मक कामकाजाच्या गतीवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी सातत्य आणि निर्णयांच्या अंमलबजावणीची व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. ट्रोइका प्रणालीच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि निर्णयांच्या प्रगतीचा पाठपुरावा करता यावा, तसेच प्रत्येक निर्णयासाठी नोडल पॉइंट, निश्चित कालमर्यादा आणि अंमलबजावणीची स्थिती नोंदविणारे सुरक्षित डिजिटल रिपॉझिटरी तयार करता येईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.