मोदी-पुतिन भेटीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य

युरोपला पुतिन यांचा सज्जड इशारा

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
Putin's stern warning to Europe युक्रेनमध्ये युरोपीय देशांनी सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा थेट अर्थ रशियासोबत युद्ध असा होईल, असा स्पष्ट इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, रशियाकडून युरोपीय देशांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली जात नसल्याचेही पुतिन यांनी स्पष्ट केले.
 
 
 
w54546566
 
पुतिन यांनी युरोपीय देशांना रशियाच्या संभाव्य धोक्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले. रशियाचा युरोपीय देशांशी संघर्ष करण्याचा कोणताही आधार नसल्याचे त्यांनी नमूद केले. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले असून, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या व्यवस्थाही रशियाच्या संमतीने अस्तित्वात आल्याचे पुतिन यांनी सांगितले. या व्यवस्थांच्या विरोधात जाणारी कोणतीही कृती रशियाच्या हिताविरोधात तसेच आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेतील मूलभूत तत्त्वांशी विसंगत ठरेल, असे त्यांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याबाबत युरोपीय देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, युक्रेनच्या भूमीवर युरोपीय सैन्य तैनात करणे म्हणजे रशियासोबत युद्ध करणे होय.
 
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाले असून, आता या संघर्षाला पाचवे वर्ष सुरू आहे. युद्धाच्या काळात अनेक युरोपीय देशांनी युक्रेनला सातत्याने पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, अमेरिकेकडून या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेची शक्यता निर्माण करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांनी मॉस्को दौऱ्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती.
दरम्यान, १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पुतिन यांची भेट घेतली. ब्रिक्स परिषदेच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी झालेल्या या बैठकीत भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासह विविध क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी ‘आर्थिक सहकार्य कार्यक्रम २०३०’च्या अंमलबजावणीबाबत तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला. मोदी आणि पुतिन यांची दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत ही दुसरी भेट ठरली. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. युक्रेन युद्धात पाश्चात्य देशांचा संभाव्य लष्करी सहभाग चर्चेत असतानाच पुतिन यांनी भारतातून युरोपीय देशांना हा स्पष्ट संदेश दिला आहे.