पुणे,
Ratnakar Mahajan passes away काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १ वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसने अभ्यासू, संयमी आणि पक्षाशी निष्ठा जपणारा ज्येष्ठ नेता गमावला आहे.

रत्नाकर महाजन यांनी राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. डॉक्टर असलेल्या महाजन यांनी समाजवादी विचारसरणीने प्रेरित होऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा मार्ग स्वीकारला. समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसशी अखेरपर्यंत निष्ठा कायम ठेवणारे नेते अशी त्यांची ओळख होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि ग. प्र. प्रधान यांसारख्या पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. यासोबतच आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचाही त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात अंगीकार केला. सामाजिक क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध अधिक दृढ झाला आणि पुढे त्यांनी पक्षाचे प्रवक्तेपदही सांभाळले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसची राजकीय पिछेहाट सुरू असताना पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे महत्त्वाचे काम रत्नाकर महाजन यांनी केले. प्रवक्ते म्हणून त्यांनी काँग्रेसची बाजू ठामपणे मांडताना अभ्यासपूर्ण मुद्द्यांना प्राधान्य दिले. राजकीय चर्चेत आक्रमक भाषा किंवा अपशब्दांचा वापर न करता समोरच्याला आपली भूमिका पटवून देण्याची त्यांची शैली विशेष ठरली. राजकारणातील नैतिकता जपणाऱ्या त्यांच्या कार्यपद्धतीची आजच्या काळात अधिक प्रकर्षाने जाणीव होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने काँग्रेससह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.