नीलेश जोशी
अकोला,
Religious violence in Urdu school ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची बीजे रुजविण्याचे पवित्र माध्यम म्हणजे शाळा. मात्र, वाशीम जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील एका शिक्षकावर लहान मुलांच्या मनात धार्मिक तेढ निर्माण करणारे विचार रुजवल्याच्या गंभीर प्रकरणी दहशतवादीविरोधी पथकाने गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्यावर वाशीम जिल्हा परिषदेने पोहरादेवी येथील उर्दू शाळेतील सहाय्यक शिक्षक मोहम्मद फुरकान शेख हसन याला १२ ऑगस्ट रोजी निलंबित केले. संबंधित शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ (१) (उ) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशात नमूद आहे.
प्रशासनाच्या निलंबन आदेशात संबंधित शिक्षकाचा इस्लामिक यूथ फेडेरेशन अर्थात आयवायएफ या संघटनेच्या उपक्रमांमध्ये सहभाग असल्याचा म्हटले आहे. २१ जून २०२४ ते २२ जून २०२४ दरम्यान, पुसद येथे आयवायएफ संघटनेद्वारा आयोजित 'कारवा ए उकाब' कार्यक्रमात मो. फुरकान शेख हसन हा सहभागी झाला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांवर धार्मिक विचारांचा प्रभाव टाकून त्यांच्या मनात हिंदू समाजाबाबत वैमनस्य निर्माण होईल, असे प्रशिक्षण दिल्याच्या गंभीर आरोपासह लहान मुलांच्या मनात हिंदू समाजाबाबत तेढ निर्माण करणे, भविष्यातील संघर्षासाठी मानसिक तयारी करणे आणि सांप्रदायिक तेढ वाढविणारे विचार रुजविण्याचा प्रयत्न झाला असून, या संदर्भातील कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासणीत निष्पन्न झाल्याचेही त्याच्या निलंबन आदेशात नमूद आहे.
या आदेशात देशद्रोहाच्या कटात सहभागी होण्याचा देखील आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार संबंधित शिक्षकाला १२ ऑगस्ट रोजी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबन काळात त्याचे मुख्यालय पंचायत समिती मानोरा येथे निश्चित करण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारवा-ए-उकाब'मध्ये संघर्षाची कवायत
पुसद येथे आयोजित इस्लामिक यूथ फेडरेशनद्वारा चाईल्ड विंगच्या वतीने आयोजित 'कारवा-ए-उकाब' कार्यक्रमात लहान मुलांच्या मनावर द्वेषाचे बीजारोपण करण्यासोबतच भविष्यकालीन संघर्षाची पूर्वतयारी म्हणून त्या पद्धतीची कवायत देखील करून घेण्यात आली, असे देखील निबंलन आदेशात म्हटले आहे.