सिराजकडे हैदराबादची धुरा!
दिनांक :12-Sep-2026
Total Views |
हैदराबाद,
hyderabad भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्यावर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोठी जबाबदारी सोपवली आहे. २०२६-२७ रणजी ट्रॉफी हंगामासाठी सिराजची हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज चमा मिलिंद याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. सिराज नुकताच दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळला होता; मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे प्रभावी कामगिरी करता आली नाही.
रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, हैदराबादचा पहिला सामना त्रिपुराविरुद्ध होणार आहे. हैदराबादला एलिट गट ‘ब’मध्ये स्थान मिळाले असून या गटात सौराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, आसाम आणि त्रिपुरा या संघांचा समावेश आहे. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतानाच सिराजसमोर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीचा फॉर्म पुन्हा मिळवण्याचेही आव्हान असेल.
श्रीलंका दौऱ्यात सिराजच्या गोलंदाजीच्या वेगात घट झाल्याचे दिसून आले होते. तो सामान्यतः ताशी १४० किलोमीटरच्या आसपास वेगाने गोलंदाजी करतो; मात्र या दौऱ्यात अनेकदा त्याचा वेग ताशी १३० किलोमीटरपेक्षा कमी राहिला. दोन कसोटी सामन्यांत त्याने एकूण ४४ षटके टाकत चार बळी घेतले. खराब रन-अप आणि लय बिघडल्यामुळे वेगावर परिणाम झाल्याचे सिराजने नंतर स्पष्ट केले होते. मागील रणजी हंगामातही त्याने राहुल सिंगच्या जागी हैदराबादचे नेतृत्व केले होते. मात्र त्यावेळी संघाला विजय मिळवता आला नाही. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबईने हैदराबादचा ९ गडी राखून पराभव केला, तर जिमखाना मैदानावरील छत्तीसगडविरुद्धचा सामना अमनदीप खरेच्या नाबाद शतकामुळे अनिर्णित राहिला.