नवी दिल्ली,
Sreesanth's father passes away. माजी भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंत यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीसंत यांचे वडील व्ही. शांताकुमारन नायर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात उपचार सुरू होते. केरळमधील लिसी रुग्णालयात उपचार घेत असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांच्या सूत्रांनी दिली असून, या घटनेनंतर श्रीसंत यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.शांताकुमारन नायर यांचे पार्थिव सध्या रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहे. त्यांचे काही नातेवाईक परदेशात असून, ते भारतात परतल्यानंतर पार्थिव केरळमधील कोठामंगलम येथील पैतृक निवासस्थानी नेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत नायर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

व्ही. शांताकुमारन नायर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळात दीर्घकाळ सेवा बजावली होती. ते संस्थेत प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते कुटुंबासह केरळमध्ये वास्तव्यास होते. दुसरीकडे, एस. श्रीसंत यांनी भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. देशाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या सामन्यांत कामगिरी बजावली. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत कुटुंबाचा, विशेषतः वडिलांचा मोठा आधार राहिला.श्रीसंत यांनी २०२२ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. भारताकडून त्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळले. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले असून, या सामन्यांमध्ये अनुक्रमे ८७, ७५ आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत.