डीजेच्या आवाजाने कानाच्या नसा होऊ शकतात डॅमेज!

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
dj system सण-उत्सव, मिरवणुका आणि लग्नसोहळ्यांमध्ये होणारा डीजेचा प्रचंड आवाज आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या लेझर लाईट्सचा वापर आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतो, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनसह शहरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. उत्सवाचा आनंद घेताना नागरिकांनी आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजाच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास कान दुखणे, कानात सतत आवाज येणे, तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बहिरेपण येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. प्रचंड आवाजामुळे डोकेदुखी, चक्कर आणि मानसिक तणाव वाढण्यासोबतच हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर अशा आवाजाचा परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे.
 
dj system
 
डीजे अनेकदा निर्धारित ध्वनीपातळीपेक्षा अधिक आवाजात वाजवले जात असल्याने कानाच्या पडद्याला म्हणजेच कानाच्या ड्रमला इजा होण्याचा धोका असतो. कानाच्या नसा अत्यंत संवेदनशील असल्याने मोठ्या आवाजामुळे त्या खराब होऊ शकतात. विशेष म्हणजे आवाजाचा परिणाम लगेच जाणवेलच असे नाही; काही प्रकरणांमध्ये कार्यक्रमानंतर एक-दोन दिवसांनी कानाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. त्यामुळे तरुणांनीही मोठ्या आवाजापासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ नागरिक, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी अशा आवाजापासून विशेष काळजी घ्यावी. मोठ्या आवाजामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होणे, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे आणि रक्तदाब वाढणे यासारखे परिणाम होऊ शकतात. परिणामी हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.
 
आयएमएने ध्वनी प्रदूषणाला विरोध करत पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच डीजेसोबत वापरल्या जाणाऱ्या तीव्र लेझर लाईट्सबाबतही डॉक्टरांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. लेझर किरण थेट डोळ्यांवर पडल्यास डोळ्याच्या पडद्याला इजा होऊन कायमस्वरूपी दृष्टी कमी होण्याचा किंवा अंधत्व येण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात लेझर लाईटवरही बंदी घालण्याची मागणी करत आयएमएतर्फे महापालिकेला निवेदन देण्यात येणार आहे. गर्भवती महिला आणि नवजात अर्भकांच्या मातांनीही डीजे, मोठे स्पीकर आणि लेझर लाईट असलेल्या ठिकाणी जास्त वेळ थांबणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. सणांचा आनंद काही काळापुरता असतो; मात्र मोठ्या आवाजामुळे होणारी कानाची इजा किंवा लेझरमुळे होणारे नुकसान कायमस्वरूपी ठरू शकते. त्यामुळे उत्सवाचा जल्लोष करताना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.