दोन अभियंत्यासह वायरमन निलंबीत

सा. बा. विद्युत विभागाची कारवाई अमरावती रुग्णालय अग्निकांड प्रकरण

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
अमरावती
amravati-hospital-fire-incident येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी आरोग्य विभागाने पाच अधिकाऱ्यांना निलंबीत केल्यानंतर आता सार्वजनीक बांधकाम विद्युत विभागाने रुग्णालयातील फायर ऑडिटसह अन्य मुद्दांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेऊन दोन अभियंत्यासह वायरमनला निलंबीत केले आहे. ही कारवाई सा. बा. विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनीता रावते यांच्या आदेशावरून झाली आहे.
 
am photo
विनोद गहूकार (उप अभियंता विद्युत), शंतनू गुल्हाने (सहाय्यक अभियंता), सुधीर शेंडे (वायरमन) असे निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहे. स्त्री रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षात विभागात अग्निकांड झाल्यावर तीन नवजात शिशूंचा मृत्यू तर सहा जखमी झाले हाेते. राज्यभर खळबळ उडविणाऱ्या या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी १३ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली हाेती. या समितीने आपल्या अहवालात निलंबन कारवाईची शिफारस केली होती. त्यानुसार प्रथम आरोग्य विभागातल्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर आता सा. बा. विद्युत विभागातील तिघांचे निलंबन झाले आहे.
 
शुक्रवारीच सा. बा. विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले अमरावतीला आले होते. त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निलंबनाची कारवाई झाली आहे. चौकशी समितीने केलेल्या शिफारशीनुसार आणखी काही जणांवर कारवाई होऊ शकते. तसेच ज्या सुधारणा समितीने सूचविल्या आहे, त्याची अंमलबजावणी होते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.