विध्वंसासाठी एआयचा वापर

अमेरिकेची कंपनी अँथ्रोपिकचा दावा; हुथीने विकसित केली क्षेपणास्त्रे

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
use of ai for destruction येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात् एआयचा वापर करून क्षेपणास्त्रे विकसित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता एआयच्या मदतीने हुथी जैविक शस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अमेरिकन एआय कंपनी अँथ्रोपिकने केला आहे.
 
use of ai for destruction
 
मानवी सोयी आणि सुविधांसाठी वापरात येणारे एआय आता दहशतवादी गट विध्वंसासाठी करत असल्याचा दावा अँथ्रोपिकने केला आहे. येमेनमधील या गटाने मार्गदर्शित रॉकेट आणि क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी त्यांच्या ‘क्लाउड चॅटबॉट’चा वापर केला. हा खुलासा अशा वेळी झाला आहे, जेव्हा इराणसमर्थित हुथी बंडखोर येमेनमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी मोहीम राबवत आहेत. अँथ्रोपिकने अहवालात म्हटले की, त्यांनी उत्तर येमेनमध्ये कार्यरत असलेल्या एका गटाची ओळख पटवली आहे, जो तीन शस्त्र विकास कार्यक्रम चालवत होता. कंपनीच्या मते, यामध्ये एक मार्गदर्शित रॉकेट, २,००० किलोमीटरपेक्षा जास्त लक्ष्य पल्ला असलेले बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि हायपरसॉनिक ग्लाइड व्हेईकल असलेल्या आवृत्तीसह अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, या गटाने हवाई शस्त्रांसाठी मार्गदर्शन, नेव्हिगेशन आणि नियंत्रण सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी क्लाउडचा वापर केला आणि त्यासाठी एका मार्गदर्शित क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. एआयचा वापर करून दहशतवादी संघटनांकडून करण्यात येणारी क्षेपणास्त्रांची निर्मिती जगासाठी धोकादायक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
 
जैविक शस्त्रांशी संबंधित एआयचा गैरवापर रोखला
एआय कंपनी अँथ्रोपिकने म्हटले आहे की, क्लाउड मॉडेल्सचा वापर करून जैविक शस्त्रे विकसित करण्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. तसेच, त्यांनी युक्रेनविरुद्ध रशियाशी संबंधित संशयित सायबर हेरगिरी मोहीम राबवण्याचे प्रयत्नही हाणून पाडले. अँथ्रोपिकने म्हटले आहे की, शस्त्रे विकसित करण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी त्यांनी आपल्या नवीनतम एआय मॉडेल्समध्ये जैविक संशोधनासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत.
मायून बेट हुथीच्या ताब्यात
येमेनच्या इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी बाब अल-मंदेबमध्ये असलेले मायून बेट ताब्यात घेतले, आणि या मोक्याच्या जलमार्गालगतच्या संपूर्ण भागावर नियंत्रण मिळवण्याचा आपला प्रयत्न पूर्ण केला, असे स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी सैन्याने बेटावरून माघार घेतल्यानंतर, शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या हुथी लढवय्ये मायून बेटावर दाखल झाले.
सौदीने तेल पाइपलाइन केली बंद
हुथीच्या हल्ल्यानंतर सौदी अरबने आपली पूर्व -पश्चिम भागात असलेली तेल पाइपलाइन बंद केली आहे. नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्यात पाइपलाइनशी संबंधित पंपिंग स्टेशनमध्ये आग लागली. तसेच काही जण जखमी झाले. सौदी याच पाइपलाइनमधून दररोज सुमारे ५० लाख बॅरल तेल पाठवत होता. सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, पाइपलाइनवर अनेक हल्ले झाले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून ती बंद करण्यात आली. मंत्रालयाची पथके पाइपलाइन सुरक्षित करण्यासाठी आणि नुकसानीचा शोध घेण्यासाठी कार्यरत आहेत.