प्रसिद्ध झालेली मतदारयादी अंतिम नाही

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा निर्वाळा

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
मुंबई,
votar Id राज्यात सध्या राबविल्या जाणाऱ्या विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत प्रसिद्ध झालेली प्रारूप मतदारयादी ही केवळ प्राथमिक स्वरूपाची असून ती अंतिम यादी नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
 

votar 
 
नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा या प्रारूप यादीतील मतदारांची संख्या कमी असल्याचे दावे काही माध्यमांमधून समोर आले होते; मात्र हे दावे वस्तुस्थितीला धरून नसून अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
 
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या प्रत्यक्ष वास्तव्याची काटेकोर पडताळणी करण्यात आली. त्यामुळे नमूद पत्त्यावर न राहणाऱ्या तसेच मृत मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. सध्या सुरू असलेल्या टप्प्यामध्ये स्थलांतरित झालेले किंवा तात्पुरते गैरहजर असलेले मात्र राज्यातच वास्तव्य असणारे नागरिक त्यांच्या सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतात. याशिवाय, १ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नव्या तरुण मतदारांची नोंदणी याच टप्प्यात केली जात आहे. प्रक्रिया अपूर्ण असताना अशा घाईगडबडीने काढलेले निष्कर्ष मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात, त्यामुळे माध्यमांनी आणि सर्व संबंधितांनी नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत अंतिम मतदारयादीची प्रतीक्षा करावी, असे आवाहनही निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल एसआयआर
सध्याच्या टप्प्याचा मुख्य उद्देश हा कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदानापासून वंचित राहू नये आणि प्रत्येकाचा यादीत समावेश व्हावा हाच आहे. ही संपूर्ण पुनरीक्षण प्रक्रिया आगामी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होणार आहे. त्यामुळे अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच जुन्या आकडेवारीशी किंवा मतदानाशी प्रारूप यादीची तुलना करणे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे ठरेल.