सावंगीत मालक बदलला गणेशोत्सवही ठरतो कुळाचार!

म्हणून दत्ता मेघे दैवत होते

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
wardha news गणेशोत्सव आता उंबरठ्यावर आलेला आहे. वर्धा जिल्ह्यात दुर्गोत्सवाच्या तुलनेत गणेशोत्सवचा फारच कमी उत्साह असतो. परंतु, ती कमतरता शेवटच्या श्वासापर्यंत वर्धेसोबत नाळ जुळून असलेल्या दत्ता मेघे यांनी भरून काढली होती. गावाच्या एका टोकावर सावंगी येथे होत असलेला गणेशोत्सव वर्धेकरांना आपला गणेशोत्सव वाटत होता. नव्हे अध्र्या विदर्भात या गणेशोत्सवाचे आकर्षण होते. गेल्या वर्षी या सावंगी येथील विद्यापीठ आणि रुग्णालयाचे मालक बदलले आणि यावर्षी येथे फक्त गणेशस्थापनाचेचा तेवढा कुळाचार होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्या शेवटच्या वर्षातील विद्याथ्र्यांमध्येही नाराजी आहे.
 
wardha news
 
वर्धेला लाभलेलं दत्ता मेघे एक वेगळेच रसायन होतं. त्यांच्यासारखा नेता वर्धा जिल्ह्यात झाला नाही आणि कदाचित होणारही नाही. दत्ता मेघे जिल्ह्यात सर्व जात, धर्म, पंथ आणि सर्व समावेशक राजकारण्यांना आपले वाटत होते. सावंगी येथे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे छोटेसे रोपटे त्यांनी लावले. त्यांच्याच नेतृत्वात याच परिसरात भव्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि पुढे अभिमत विद्यापीठ तयार झाले. गणपती आणि साईबाबांवर विशेष श्रद्धा असलेल्या दत्ता मेघे यांनी रुग्णालय परिसरात साईबाबांचे मंदिर बांधले तर १९८६ च्या सुमारास गणेशोत्सव सुरू केला. राधिकाबाई स्मृती न्यासाचा हा गणेशोत्सव सार्या वर्धेला आपला वाटू लागला होता. गणेशाची आकर्षक मूर्तीची आवड असलेल्या मेघे यांनी मूर्ती कलाकाराला आपल्या संस्थेत नोकरीलाच ठेऊन घेतले होते. सुरुवातीच्या काळात आताच्या शस्त्रक्रीया विभागाच्या ठिकाणी गणेेशाची स्थापना होत होती. संस्थेचा आवाका वाढू लागला आणि गणपतीची स्थापना दर्शनी भागात विद्यापीठाच्या परिसरात होऊ लागली.
 
 
अगदी गणपतीसाठी कायमस्वरूपी जागाही बांधून घेण्यात आली. सावंगीतील गणेशोत्सवात अनुप जलोटा, राजेश खन्ना, कादर खान, जया भादुडी सारख्या दिग्गजांचे कार्यक्रम वर्धेसाठी एक पर्वणी होती. गेल्या २४ वर्षांपासुन विदर्भातील नव गायकांना संधी म्हणून ‘स्वर वैदर्भी’ कार्यक्रम घेऊन लाखो रुपयांचे बक्षीस दिले जात होते. शिक्षकांसाठी गुरूकूल हा कार्यक्रम होत होता. त्यात प्र कुलगुरूंपासुन सर्व प्राध्यापक सहभागी होत होते तर शिक्षकेत्तर कर्मचसार्यांसाठी जलसा हा कार्यक्रम होत होता. गणेशोत्सवाचा संपुर्ण खर्च राधिकाबाई स्मृती न्यास करीत होता आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्याथ्र्यांसाठी गणेशोत्सव निख्खळ मनोरंजनाची संधी घेऊन येत होता. या गणेश उत्सवात सर्व बंधन बाजूला ठेवत विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होत होते. विसर्जनाच्या मिरवणुकीत विद्यार्थी, विद्यार्थिनी स्वत: ढोल ताशे वाजवत गुलाल उधळत सहभागी होत होते. दररोज आरतीला वर्धेतील लोक प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजसेवकांना निमंत्रण असायाचे. आठही दिवस दत्ता मेघे येथे असायचे आणि मिरवणुकीत स्वत: सहभागी होत होते. गेल्या वर्षी या विद्यापीठ आणि रुग्णालयाचे मालक बदलले, प्रशासनही बदलले, नवनवीन नियमही लागू झाले. त्यासोबत यावर्षी येथे फक्त गणपतीची स्थापना आणि विसर्जन एवढ्या कार्यक्रमाची पत्रिका तयार झाली आहे. त्यामुळे वर्धेकरांचे आकर्षण असलेल्या गणेशोत्सवापासुन मुकावे लागणार असल्याचे फिरता फिरता कळले.