ब्रिजटाउन,
barbados बार्बाडोस ट्रायडंट्स आणि जमैका किंग्समेन यांच्यातील कॅरिबियन प्रीमियर लीग २०२६ मधील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. विजयासाठी शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना आणि हातात केवळ दोन गडी शिल्लक असताना गुडाकेश मोतीने जबरदस्त फलंदाजी करत सामन्याचे पारडे फिरवले. शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने बार्बाडोसला दोन गडी राखून विजय मिळवून दिला आणि संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित केले.
प्रथम फलंदाजी करताना जमैका किंग्समेनने ९ गडी गमावून १५० धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना बार्बाडोस ट्रायडंट्सने ८ गडी गमावून १५१ धावा करत सामना आपल्या नावावर केला. बार्बाडोसच्या या विजयामुळे त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला. विशेष म्हणजे, पराभव पत्करूनही जमैका किंग्समेनने गुणतालिकेत सेंट लुसिया किंग्समेनला मागे टाकत चौथे स्थान मिळवले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सलग तीन पराभवांमुळे सेंट लुसिया संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
मोतीने अखेरच्या षटकात आपल्या फलंदाजीने सामन्याला नाट्यमय वळण दिले. पहिल्याच चेंडूवर त्याने पॉइंटच्या दिशेने चौकार लगावला. त्यानंतर ओडियन स्मिथने सलग दोन वाइड चेंडू टाकले. पाच चेंडूंमध्ये ११ धावांची गरज असताना मोतीने लाँग ऑफच्या दिशेने षटकार ठोकला. अखेर शेवटच्या चेंडूपूर्वी दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत आली. निर्णायक चेंडूवर मोतीने चौकार मारत बार्बाडोसचा विजय साकारला आणि मैदानावर जल्लोषाला सुरुवात झाली.
लीग टप्प्यात बार्बाडोस ट्रायडंट्सचा आणखी एक सामना बाकी असून त्यांच्यासमोर गुणतालिकेत अव्वल असलेल्या गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचे आव्हान असेल. प्लेऑफच्या समीकरणानुसार बार्बाडोस ट्रायडंट्स आणि जमैका किंग्समेन यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे, तर गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा क्वालिफायर १ मध्ये अँटिग्वा आणि बार्बुडा फाल्कन्सशी सामना होईल.