नवी दिल्ली,
arun jaitley stadium भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी आपली प्लेइंग-११ निवडली असून, त्यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संघातून वगळले आहे. विशेष म्हणजे, सलामीसाठी चोप्रांनी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीला पसंती दिली आहे. भारतीय संघात सलामीसाठी अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी आणि ईशान किशन असे चार पर्याय आहेत. मात्र, ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असल्याने सलामीच्या जागेसाठी वैभव, सॅमसन आणि अभिषेक यांच्यात मुख्य स्पर्धा आहे.

आकाश चोप्रांच्या मते, संजू सॅमसनने असे काहीही केलेले नाही ज्यामुळे त्याला प्लेइंग-११मधून बाहेर ठेवावे. आपल्या यूट्यूब वाहिनीवर बोलताना त्यांनी सांगितले की, आयर्लंड दौऱ्यात सॅमसनचा चांगला खेळ झाला नाही, त्या मालिकेत वैभवला खेळवले गेले नाही. त्यानंतर इंग्लंड दौरा फारसा खराब नव्हता, मात्र सॅमसनला संघातून वगळण्यात आले. पुढे त्याला झिम्बाब्वे दौऱ्यातही स्थान मिळाले नाही. आता पुन्हा त्याची निवड करण्यात आली असल्याने अभिषेक आणि सॅमसन यांनी डावाची सुरुवात करावी, असे चोप्रांचे मत आहे.
संजू सॅमसनच्या समर्थनार्थ बोलताना चोप्रांनी अभिषेक शर्माच्या खराब काळाचाही उल्लेख केला. अभिषेकलाही एका टप्प्यावर खराब फॉर्मचा सामना करावा लागला होता, मात्र त्यावेळी त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे सॅमसनसोबतही अभिषेकप्रमाणेच वागणूक देऊन त्याला अंतिम अकरामध्ये पुन्हा संधी द्यावी, असे चोप्रांनी म्हटले आहे. विश्वचषकानंतर ईशान किशनने तिसऱ्या क्रमांकावरील स्थान निश्चित केले आहे. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, तर तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतात.
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत नीतीश कुमार रेड्डी आणि शिवम दुबे या दोन वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान देता येईल, असेही चोप्रांनी सांगितले. अक्षर पटेल आठव्या क्रमांकावर फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावू शकतो. विशेष गोलंदाज म्हणून आकाश चोप्रांनी जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांची निवड केली आहे. याशिवाय अक्षर पटेल, शिवम दुबे आणि नीतीश कुमार रेड्डी हेही गोलंदाजीचे पर्याय असतील. तिलक वर्मा आणि वैभव सूर्यवंशीदेखील एक-दोन षटके गोलंदाजी करू शकतात, असे त्यांनी नमूद केले. आकाश चोप्रांच्या प्लेइंग-११मध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.