निगारच्या निर्णयावर बीसीबीचे स्पष्टीकरण

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
ढाका,
bcbs clarification on nigars decision महिला आशिया कप २०२६ मधील भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी झालेल्या हस्तांदोलनाच्या प्रकारावरून बांगलादेशची कर्णधार निगार सुलतान अडचणीत आली आहे. नाणेफेकीनंतर निगारने भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत हस्तांदोलन केले नाही. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसतानाच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या प्रकरणापासून स्वतःला दूर केले आहे. हस्तांदोलन न करण्याचा निर्णय बोर्डाकडून देण्यात आलेला कोणताही सल्ला किंवा निर्देश नव्हता, तर निगारने स्वतः घेतलेला वैयक्तिक निर्णय होता, असे बीसीबीने स्पष्ट केले आहे.
 
bcbs clarification on nigars decision
 
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला समितीचे अध्यक्ष रफिकुल इस्लाम बाबू यांनी या प्रकरणावर भूमिका मांडताना निगारला बोर्डाकडून अशा प्रकारची कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचे सांगितले. खेळाच्या माध्यमातून देश आणि लोकांमधील संबंध अधिक दृढ होतात, असा बोर्डाचा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतासह जगातील सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची बीसीबीची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे निगारने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे तिचा वैयक्तिक असल्याचे रफिकुल इस्लाम बाबू यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ४० धावांनी मात करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १४९ धावा उभारल्या. शफाली वर्माने ४४ चेंडूंत ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताच्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून १०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून दीप्ती शर्माने प्रभावी गोलंदाजी करत तीन बळी घेतले. या पराभवासह बांगलादेशचे महिला आशिया चषकातील आव्हान पुन्हा एकदा उपांत्य फेरीतच संपले. बांगलादेशने २०१८ मध्ये प्रथमच महिला आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले होते.