सिंदी (रेल्वे),
nandi pola festival येथील प्रसिद्ध नंदी पोळ्यात नियमांचे उल्लंघन करून अति आवाजात डी. जे. वाजविणे लेझर लाइटचा वापर केल्याप्रकरणी ९ डी. जे. मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातून लाकडी नंदी, झांकी मिरवणूक निघाली. यात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रेक्षपणाचा वापर होत होता. यामुळे पोलिसांनी ध्वनी मापक यंत्राद्वारे सॅम्पल घेतले होते. त्या ठिकाणची ध्वनीची तिव्रता ५८ डेसीबल व जास्तीतजास्त ६८ डेसीबल ठेवली होती.

सर्व मंडळांना परवानगी देण्यापूर्वी बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांना मोठ्या क्षमतेच्या ध्वनी प्रेक्षपणाचा व लेझर लाईट नागरिकांच्या आरेाग्यास धोकादायक आहे, याची पूर्व सूचना दिली होती. परंतु, नंदी पोळ्याच्या दिवशी मिरवणुकीत साई डी. जे. साउंडचे सौरभ नेवारे, नागपूर, अमेरिकन मंडळाचे सिद्धार्थ डंभारे, चांद तारा धुमाल डी. जे. साउंडचे सोनू बघेल, गणेश डम्पुलवार, गुरुनानक धुमाल पार्टीचे डी. जे. साउंडचे करण बावणे, भोई समाज मित्र परिवाराचे अजय बावणे, लष्कर धुमाल डी. जे. साउंडचे दिलदार मो. अबरार, मित्र परिवारचे मिलिंद बेलखोडे, सूजर काटोले यांनी कायद्याचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या कर्कश आवाजात ध्वनी प्रदूषण केले. तसेच लेझर लाइट लावून लोकांच्या आरेाग्यास धोका निर्माण केला. मशिनद्वारे ध्वनीची तिव्रता मोजली असता ती ६८ डेसीबल पेक्षा अधिक होती. या सर्व मंडळांवर सिंदी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.