मानोरा तालुक्यात सोयाबीनचे पीक जळून शेतकरी हतबल

मजूरदारांवर उपासमारीची वेळ

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
पावसा अभावी ६० टक्के पेक्षा जास्त सोयाबीन गेल्यात जमा
 
 
मानोरा,
soybean crops scorch तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील मुख्य पीक असलेले सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातातून गेल्यात जमा झाले आहे. ६० टक्कयांपेक्षा अधिक क्षेत्रातील सोयाबीन करपून गेले असून, शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतात हिरवेगार असलेले सोयाबीन पूर्णपणे जळून, वाळून काळे-तपकिरी झाले आहे. करपलेल्या पिकामूळे चिंताग्रस्त अवस्थेत शेतकरी दिसत आहे. झाडाला शेंगा लागल्या आहेत, मात्र पाण्याअभावी दाणे भरलेच नाहीत.
 
 
soybean crops scorch
 
शेतकर्‍यांसह मजुरांचेही कंबरडे मोडले
या नुकसानीचा फटका केवळ शेतकर्‍यांनाच नाही तर शेतीवर अवलंबून असलेल्या मजूर वर्गालाही बसला आहे. सोयाबीन काढणी, मळणी, वाहतूक या कामांवर हजारो मजूर कुटुंबांची उपजीविका अवलंबून असते. पीकच हाती येणार नसल्याने मजुरांसमोरही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांची आबाळ होण्याची शक्यता आहे.
 
 
बियाणे, खते, औषध फवारणी यावर हजारो रुपयांचा खर्च करूनही पदरी निराशा आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. हवामान विभागाने गणेश उत्सव काळात पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर या काळात चांगला पाऊस पडला तर ज्या ठिकाणी पीक थोडेफार तग धरून आहे, तिथे आणि उरलेल्या कपाशी, तूर पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळून स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस न आल्यास शेतकर्‍यांना जबर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकरी व मजुरांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.