भारताने साधला ब्रिक्समध्ये ‘समान सूर’!

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
BRICS नवी दिल्लीत पार पडलेल्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी मायदेशी रवाना झाले आहेत. परिषद कितपत यशस्वी ठरली, याबाबत तज्ज्ञांकडून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. सदस्य देशांमधील मतभेद आणि परस्परविरोधी भू-राजकीय भूमिका असतानाही त्यांना एका समान भूमिकेवर आणण्यात भारताला यश मिळाले असून, त्याचे प्रतिबिंब नवी दिल्ली घोषणापत्रात उमटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 
BRICS
 
ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या जिंदाल स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सचे डीन प्राध्यापक डॉ. श्रीराम चौलिया यांनी या परिषदेच्या निष्कर्षांना भारताच्या मुत्सद्देगिरीचे आणि बहुपक्षीय सहभागाचे उल्लेखनीय यश संबोधले. विविध सदस्य देशांमधील मतभेद आणि विरोधाभास हाताळत सर्वांना किमान समान भूमिकेवर आणणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिक्सचा विस्तार झाल्यानंतर मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र भारताने सदस्य देशांमधील विविधतेला अडथळा न बनू देता तिचे सामर्थ्यात रूपांतर केल्याचे चौलिया यांनी नमूद केले. युद्धे, वादग्रस्त विषय आणि वाढत्या भू-राजकीय तणावासारख्या मुद्द्यांवरील घोषणेमध्ये भारताचा हा दृष्टिकोन दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
युरोपियन प्रेस फेडरेशनचे पत्रकार मार्को एल्पेगियानी यांनी नवी दिल्ली घोषणेत दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित मुद्द्यांना महत्त्व दिल्याचे सांगितले. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला विरोध करण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. दक्षिण आफ्रिकेचे पत्रकार सियाबोंगा गुडमन माडोंडो यांनीही ४५ पानांचे घोषणापत्र तयार होणे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. इराण, मध्य पूर्वेतील युद्धे, जागतिक स्थैर्य, मानवी तस्करी, गुंतवणूक आणि आर्थिक विकास यांसारख्या विषयांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र घोषणापत्र तयार होणे ही केवळ सुरुवात असून, त्यातील भूमिकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढील काळात ठोस प्रयत्नांची गरज असल्याचेही माडोंडो यांनी सांगितले. यापूर्वी अमेरिकेचे दक्षिण आशिया विश्लेषक मायकल कुगेलमन यांनीही नवी दिल्ली घोषणेला भारतासाठी मोठे राजनैतिक यश असल्याचे म्हटले होते.